वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यावर राज्य सरकारने विक्री कर विभागाचे शनिवारी नाव बदलले आणि या विभागाचे नामकरण आता वस्तू आणि सेवा कर विभाग असे केले आहे. राज्यात आतापर्यंत सात लाखांपेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी नोंदणी केली असून, व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरासन करण्याकरिता ४१ सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या केंद्रामध्ये शंका उपस्थित केली वा विचारणा केल्यास तीन दिवसांमध्ये शंकांचे निरासन केले जाईल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.  व्यापारी किंवा अन्य कोणालाही काही शंका किंवा तक्रारी असल्यास संपूर्ण राज्याकरिता १८०० २२ ५९०० हा क्रमांक कार्यरत केला आहे. यावर संपर्क साधल्यास अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जाईल. राज्याच्या उत्पन्नात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या विक्री कर विभागाचे नावही बदलण्यात आले. वित्तमंत्री मुनगंटीवार व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माझगाव येथील कार्यालयात झालेल्या समारंभात नामांतर करण्यात आले. तसेच विक्री कर भवनाचे नावही वस्तू आणि सेवा कर भवन असे करण्यात आले.

औरंगाबादमध्ये विशेष परिणाम नाही

औरंगाबाद:  औरंगाबादच्या बाजारपेठेत त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. शहरातील गुलमंडी भागात सर्वात जास्त कपडय़ांची दुकाने आहेत. मात्र, कपडय़ावर स्वतंत्रपणे ‘जीएसटी’ची पावती कोणी ग्राहकांना दिली नाही. ही प्रणाली विकसित होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हॉटेल, मल्टिप्लेक्समध्ये पहिल्या दिवशी जुनेच दर

नाशिक : वस्तू व सेवा कर प्रणालीनुसार संगणकीय आज्ञावलीचे अद्ययावतीकरण न झाल्यामुळे पहिल्याच दिवशी शहरातील काही मल्टिप्लेक्सला नुकसान सहन करावे लागले. संबंधितांनी दिवसभरातील चित्रपटाचे ‘शो’ बंद ठेवले तर काहींनी जुन्या दराने तिकीट विक्री केली. खाद्यगृहांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information centers about gst