मनुष्यबळ कमतरतेमुळे अडचणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नमिता धुरी

मुंबई : आरे वसाहतीतील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना अतिक्रमण हटवण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि पुरेसे मनुष्यबळ आरे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील हरितक्षेत्र मोठय़ा प्रमाणावर नष्ट होत आहे. आरे वसाहत ३,४०० एकर परिसरात वसलेली आहे. त्यापैकी १४०० एकर जागा विविध विभागांना देण्यात आली आहे. उर्वरित जागा आरे प्रशासनाच्या नियंत्रणाखाली आहे. पुरेसे सुरक्षारक्षक नसल्याने आरेतील हरितक्षेत्र अतिक्रमणासाठी सहज उपलब्ध होते. उपलब्ध सुरक्षारक्षकांकडे गस्त घालण्यासाठी आवश्यक असलेले शासकीय वाहन नाही. या कामासाठी त्यांना स्वत:चे खासगी वाहन वापरावे लागते. एखाद्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ते तोडण्यासाठी कामगार नसल्याने सुरक्षारक्षकांकडूनच निष्कासनाचे काम करून घेतले जाते. यंत्रसामग्री नसल्याने मजबूत बांधकाम तोडणे कर्मचाऱ्यांसाठी अडचणीचे ठरते आहे. याचा गैरफायदा अतिक्रमण करणारे घेतात. अशाच प्रकारे या भागातील दुर्गानगर, गौतमनगर, माळीनगर, युनिट ३२, जिवाचा पाडा, चरणदेव पाडा, युनिट २२, इत्यादी एकूण ४० ठिकाणी अतिक्रमण झाले आहे.

दुग्धव्यवसाय विकास विभागाकडे जीप आणि यंत्रसामग्रीची मागणी केली आहे. फेब्रुवारीपासून ‘महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा’कडून ५० सुरक्षारक्षक घेतले जाणार आहेत. बऱ्याचदा अतिक्रमण तोडण्यासाठी गेले असता महिलांना पुढे करून अडवणूक केली जाते. त्यामुळे महिला सुरक्षारक्षकांनाही तैनात केले जाईल. सुरक्षारक्षकांसाठी आतापर्यंत ८० लाख रुपये खर्च केले जात होते. यापुढे १ कोटी ६० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

रवींद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insufficient mechanism remove encroachment ysh