‘जेईई’ परीक्षेसाठी आधार आणि शाळेमध्ये नोंद असलेले नाव एकसारखे असणे आवश्यक

संयुक्त प्रवेश परीक्षा(जेईई) देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आणि शाळेमध्ये नोंद असलेले संपूर्ण नाव हे क्रमासह एकसारखेच असावे, अशी सूचना केंद्रीय माध्यमिक मंडळाने(सीबीएसई) दिल्यामुळे आधार कार्डवरील नावामध्ये सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मुंबईतील बहुतांश आधार केंद्रावर बारावीच्या विद्यार्थ्यांनी यासाठी गर्दी केली असून खासगी आधार केंद्रावरही अधिक पैसे मोजून नावामध्ये सुधारणा करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत.

२०१८ च्या शैक्षणिक वर्षांतील जेईईच्या मुख्य प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना यंदा आधारक्रमांक किंवा आधार कार्डचा नोंदणी क्रमांक लिहिणे सीबीएसईने बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये नोंद असलेले आणि आधारकार्डवर नमूद असलेले विद्यार्थ्यांचे नाव हे क्रमासह एकसारखे नसल्यास विद्यार्थ्यांनी आधारमधील नावात सुधारणा करण्यासाठी अर्ज दाखल करावा आणि अर्जाचा पावती क्रमांक परीक्षा अर्जामध्ये नमूद करावा किंवा शाळेत नोंद केल्याप्रमाणे अर्जामध्ये नाव नमूद करावे आणि त्यानंतर आधारमधील सुधारणेसाठी अर्ज करावा असे सीबीएसईच्या माहिती पत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये नाव हे आडनाव, प्रथम नाव आणि वडिलांचे नाव या क्रमाने नमूद आहे. परंतु आधारकार्डवर मात्र प्रथम नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या क्रमाने नमूद आहे.

सीबीएसईच्या या सूचनेमुळे बहुतांश कोंचिग क्लास, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आधारमधील नाव बदलून घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे नाव बदलावे की नाही असा संभ्रम पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

परीक्षेसाठी अडचण नाही

मागील वर्षी आधारवरील नावाबाबत असाच गोंधळ निर्माण झाला होता. त्यावेळी सीबीएसई कागदपत्रांची तपासणी करत नसल्यामुळे नावातील अशा प्रकारच्या गोंधळामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास अडचण येणार नाही. प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी आधारमधील नावामध्ये सुधारणा करण्यासाठी परीक्षा अर्ज भरल्यानंतर अर्ज करावा, असे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले होते.