जिल्हास्तरावरील मुलाखतींदरम्यान सावळागोंधळ; नव्या निकषांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांमध्येच अस्पष्टता
राज्यातील आदर्श शिक्षक पुरस्कारांमधील ‘वशिलेबाजी’ आयत्यावेळी निकष बदलून दूर करावयास निघालेल्या राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने निवड प्रक्रियेत घालून ठेवलेल्या सावळागोंधळाचा अनुभव आता जिल्हास्तरावरील मुलाखतींना सामोरे जाणाऱ्या शिक्षक-मुख्याध्यापकांना येत आहे. नव्या निकषांची फूटपट्टी लावून शिक्षकांची वर्षभराची कामगिरी कशी तपासायची याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांमध्येच स्पष्टता नाही. त्यामुळे एके ठिकाणी एक वर्ग डिजिटल असेल तर गुण, तर दुसरीकडे शाळेतील सर्व वर्ग डिजिटल नसल्याने शून्य गुण, अशा पद्धतीने शिक्षकांच्या कामाचे मूल्यांकन करण्यात येत आहे. निकषांमधील संदिग्धतेमुळे पुरस्कार निवड प्रक्रिया फारच व्यक्तिनिष्ठ झाल्याची शिक्षकांची तक्रार असून त्यांच्या अस्वस्थतेत भरच पडली आहे.
यंदाच्या राज्य शिक्षक पुरस्कारांकरिता वर्षभरात दोन वेळा निकष बदलण्यात आले. एरवी स्वातंत्र्य दिनी हे पुरस्कार जाहीर केले जातात. त्यासाठीचे प्रस्ताव डिसेंबर, २०१५लाच विभागाकडे जमा झाले होते, परंतु २१ जुलैला आधीच्या १७ निकषांऐवजी ३० सुधारित निकष जाहीर करून त्यानुसार ५ ऑगस्टपर्यंत नव्याने ऑनलाइन प्रस्ताव पाठविण्याची टूम विभागाने काढली. त्याचाच मनस्ताप सध्या शिक्षकांना भोगावा लागतो आहे.
शिक्षकांची कामगिरी तपासण्याकरिता जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांनी १२ आणि १४ ऑगस्टला शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या, परंतु नव्या निकषांनुसार शिक्षकांची कामगिरी कशी तपासायची याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांमध्येच एकवाक्यता नाही.
खुद्द अधिकारीही नाव न छापण्याच्या अटीवर ही बाब मान्य करीत आहेत. मुंबईचेच उदाहरण द्यायचे तर ‘दिशा’ हे विभागातर्फेच दरवर्षी विज्ञान प्रदर्शनानिमित्ताने निघणारे नियतकालिक. मुंबईच्या उत्तर विभागाने यात लेखन केलेल्या शिक्षकांना ते ‘प्रथितयश’ आहे असे मानून गुण दिले, परंतु याच नियतकालिकात लेखन करणाऱ्या दुसऱ्या एका शिक्षकाचे गुण पश्चिम विभागाने नाकारले. कारण, ‘प्रथितयश’ नियतकालिक किंवा वर्तमानपत्र याची व्याख्याच स्पष्ट नाही. खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’कडे नव्या निकषांबाबत खुलासा करताना शिक्षकाने एखाद्या वर्तमानपत्रात ‘वाचकांच्या पत्र्यव्यवहारा’त एखादे पत्र लिहिले असले तरी त्याचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र शैक्षणिक संशोधनपर निबंध प्रकाशित लेख असा उल्लेख असताना शिक्षक वाचकांच्या पत्रातील लेखन पाठवतीलच कसे, असा प्रश्न आहे.
वर्गातील डिजिटलाझेशनच्या बाबतीतही हेच. एके ठिकाणी एक वर्ग आहे म्हणून गुण, तर दुसरीकडे सगळेच वर्ग डिजिटल कसे नाहीत म्हणून भोपळा. हा सावळागोंधळ राज्यभर आहे, परंतु मुलाखतीची टूम आणि आयत्यावेळी हे सर्व बदल लागू करण्याचा अनाठायी आग्रह यामुळे यंदाची शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया चांगलीच बाधित झाली आहे.
दुसरीकडे अनेक अजब निकषांची जोड लावली गेल्यानेही शिक्षकांमध्ये नाराजी आहे. उदाहरणार्थ वर्गातील एका विद्यार्थ्यांला मिळालेला क्रीडा पुरस्कार. मराठी भाषेच्या शिक्षकाच्या वर्गात एखाद्या विद्यार्थ्यांने क्रिकेट किंवा खो-खोकरिता पुरस्कार मिळविलाही असेल तरी त्यात भाषा शिक्षकाचे योगदान काय, असा सवाल एका शिक्षकाने केला.
हा निकष फक्त क्रीडा किंवा स्काऊट गाइड शिक्षकाला लावणे योग्य होते, पण भाषा, गणितसारख्या शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे असे प्रमाणपत्र सादर केल्यास त्याला जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कारानुसार अनुक्रमे दोन, तीन आणि पाच असे गुण दिले जाणार आहेत. हाच मुद्दा पायाभूत चाचणीतील वर्गाच्या सरासरी श्रेणीचा असल्याचे शिक्षकांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
हा ‘आदर्श’ कसा चालतो?
आधीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये वशिलेबजी होती म्हणून नवे निकष आणले गेले असे शालेय शिक्षण विभागाचे म्हणणे आहे, मात्र जिल्हास्तरावरील शिक्षकांच्या मुलाखतींदरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांसोबत गेल्या वर्षी शिक्षक पुरस्कार लाभलेल्या मुख्याध्यापकांनाही निवड समितीमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. आधीच प्रक्रियाच सदोष होती, तर या प्रक्रियेतून निवडला गेलेला मुख्याध्यापक कसा चालतो, असा खोचक सवाल एका शिक्षकाने केला आहे.
नवी पद्धत पुरस्कारांचे अवमूल्यन करणारी
जुन्या निकषांमध्ये शिक्षकाच्या शैक्षणिक कामगिरीचा आढावा विस्तृतपणे घेतला जात होता. नव्या निवड प्रक्रियेत त्यातल्या अनेक बाबींची दखलच घेण्यात आलेली नाही, अशी खंत एका शिक्षकाने व्यक्त केली. जिल्हास्तरावर मुलाखतींना सामोरे गेल्यानंतर पुन्हा निवड झालेल्या शिक्षकांना पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे राज्यस्तरावर शिक्षण संचालकांसमोर आपल्या कामगिरीचे सादरीकरण करायचे आहे. शिक्षकांना या पद्धतीने मुलाखतींना बोलावून कामाचे सादरीकरण करण्याची पद्धत मुळी या पुरस्कारांचे अवमूल्यन करणारी आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांनी या प्रक्रियेतून माघार घेणे पसंत केले आहे.
पायाभूत चाचण्या प्राथमिकच्या पहिली ते आठवीकरिता लागू आहेत. त्याने नववी ते बारावीच्या वर्गाना शिकविणाऱ्या माध्यमिक किंवा उच्च माध्यमिकच्या शिक्षकांच्या अध्ययन गुणवत्तेचे मोजमाप करणे अवास्तव आहे.
– शिक्षक