आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी लवकरात लवकर जागा वाटपाची चर्चा सुरु करावी, असे अनेकदा आवाहन करुनही शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आता आपल्या पक्षासाठी कोणते मतदारसंघ फायद्याचे ठरु शकतात यासाठी शोधमोहीम सुरु करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पुढील माहिन्यांपासून ते राज्यभर दौरा करणार आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या मुंबईसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपशी युती करुनही आरपीआयला फारसा फायदा झाला नाही. तरीही २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका महायुतीसोबत राहूनच लढविण्याचा निर्धार रामदास आठवले यांनी केला आहे. त्यासाठी त्यांना शिवसेना, भाजप व आरपीआय यांच्यात लवकरात लवकर जागावाटपाची चर्चा व्हावी असे वाटते. कोणते मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार आहेत हे एकदा स्पष्ट झाले की, त्यानुसार तयारी करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून जागा वाटपाची चर्चा सुरु करा असे आवाहन शिवसेना नेतृत्वाला करीत आहेत, परंतु त्याला कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल आठवलेही नाराज आहेत.
आगामी निवडणुकांबाबत काय तयारी करायची यावर चर्चा करण्यासाठी आरपीआयच्या प्रदेश कार्यकारिणीची व जिल्हाध्यक्षांची गेल्या बुधवारी मुंबईत बैठक झाली. शिवसेनेकडून जागावाटपाच्या वाटाघाटी करण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्य़ातील पक्षासाठी कोणते सोयीचे व फायद्याचे मतदारसंघ आहेत, याची यादी करावी अशी सूचना त्यांनी केली. आठवले त्यासाठी स्वत राज्याचा दौरा करुन आरपीआयच्या मतदारसंघांची निवड करणार आहेत, असे सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jumble in rpi due to no response from shivsena