मुंबई : कांदिवली येथील एका घरात शिरलेल्या चोराच्या हाती ‘चकाकणारे’ सोन्याचे दागिने आणि महागडे घड्याळ असे घसघशीत घबाड लागले. हा चोर खूष झाला. पण घरातील सदस्यांनी मात्र चोरी होऊनसुद्धा सुटकेचा निश्वास सोडला… कारण चोराने सोन्याच्या खऱ्या दागिन्यांना हात न लावता चकाकणारे सोन्यासारखे दिसणारे दागिने आणि महागडे वाटणारे साधे घड्याळ लंपास केले होते.
व्यापारी तुषार दारोड कांदिवली (प.) येथील कस्तुरबा क्रॉस रोडवरील साफल्य इमारतीत राहतात. साफल्य इमारत जुनी असून त्याच्या दुसऱ्या मजल्यावर दारोड पत्नी, मुलगा आणि आईसह राहतात. त्यांच्या घरातील हॉलला मोठी खिडकी असून त्याला लोखंडी जाळी लावण्यात आली आहे. मंगळवारी रात्री ते जाळी बंद करण्यास विसरले. दरम्यान मंगळवारी मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांच्या घरात एक भुरटा चोर शिरला. हॉलमधील खिडकीची जाळी उघडी असल्याने त्याने आत प्रवेश केला. घरातील सदस्य झोपलेले असताना तो दबक्या पावलाने बेडरूममध्ये गेला. कपाट उघडण्यात त्याला यश आले. कपाटाच्या खणात ‘चकाकणारे’ दागिने त्याला दिसले. तसेच कपाटात एक महागडे घड्याळही त्याला दिसले. आयतेच घबाड मिळाल्याने तो खूष झाला. त्याने घरातील एक पिशवी घेऊन हा ऐवज त्यात भरला आणि तेथून पळ काढला.
सकाळी उठल्यानंतर घरातील कपाट अस्ताव्यस्त झाल्याचे दारोड कुटुंबाला दिसले. त्यावरून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र चोरीला गेलेला ऐवज लक्षात येताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. चोराने चकाकणारे दागिने खऱ्या सोन्याचे समजून बनावट दागिने आणि पाचशे रुपयांचे स्मार्ट घड्याळ चोरून नेले. याच दागिन्यांच्या बाजूला असलेल्या पेटीत सोन्याचे खरे दागिने होते. मात्र चकाकणारे दागिने पाहून ते खरे असल्याचा समज झाल्यामुळे त्याने ते चोरले, असे दारोड यांनी सांगितले. याच कपाडात राडो कंपनीचे महागडे घड्याळ होते. परंतु आकर्षक दिसणारे स्मार्ट घड्याळ (स्मार्ट वॉच) महागडे वाटल्याने चोराने ते नेले, असे दारोड यांनी सांगितले. एका समारंभासाठी दारोड यांच्या पत्नीने खोटे दागिने (ईमिटेशन ज्वेलरी) आणले होते. चकाकणाऱ्या दागिन्याने आम्हाला वाचवले, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. नकली दागिन्यांमुळे आमचे सोन्याचे खरे दागिने वाचले, असेही त्यांनी सांगितले.
या चोरी प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे याप्रकरणाचा तपास करीत आहोत, असे कांदिवली पोलिसांनी सांगितले.