मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’अंतर्गत फेब्रुवारीचे अनुदान जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिले जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिली. तर मार्चचा लाभ अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निधी उपलब्धतेनुसार दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी लाभ मिळाला नसल्याने लाडक्या बहिणींकडून विचारणा होऊ लागली होती. त्यामुळे फेब्रुवारीचा लाभ ८ मार्च रोजी असलेल्या जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ मार्चला दिला जाणार असल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिली. फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे अनुदान एकत्रित दिले जाणार नाही. मार्च महिन्यासाठी लागणारा निधी वित्त विभागाने हस्तांतरित केल्यानंतर अनुदान दिले जाईल, असे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झाली. त्यानुसार प्रत्येक पात्र बहिणीच्या बँक खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपये जमा केले जात आहेत. दोन कोटी ४६ लाख पात्र लाडक्या बहिणींना आतापर्यंत सहा लाभ देण्यात आले आहेत. जानेवारीत यातील ५ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याने २ कोटी ४१ लाख बहिणींना लाभ देण्यात आला. फेब्रुवारीतील पडताळणीमध्ये ही संख्या आणखी चार ते पाच लाखांनी कमी होणार आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी असलेले निकष पूर्वीप्रमाणे कायम आहेत. विरोधकांना नैराश्य आले आहे. ही योजना विरोधकांच्या डोळ्यात पहिल्यापासूनच खुपत आहे. जाणीवपूर्वक योजनेच्या विरोधात अफवा पसरविल्या जात आहेत. महायुती सरकार ही योजना सक्षमपणे कार्यरत ठेवणार आहे.

आदिती तटकरेमहिला व बाल विकासमंत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladki bahin installment for feb to be released on eve of international womens day says aditi tatkare zws