मोडकसागर तलावातून पाणी काढण्यासाठी खणण्यात आलेल्या बोगद्याचे धरणातील मुख सुरुंगस्फोटाने फोडण्याचा- लेक टॅपिंगचा प्रयोग बुधवारी झाला. या स्फोटामुळे दगड व मातीचा ढिग बोगद्यात अडकला असण्याची शक्यता आहे. पावसाळ्यानंतर हा बोगदा पूर्ण मोकळा केला जाईल़ या लेक टॅपिंगमुळे धरणातील आणखी चार मीटर खोलीपर्यंतचे पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच मध्य वैतरणा तसेच प्रस्तावित गारगाई धरणाचे पाणी उपसण्यासाठी या बोगद्याचा उपयोग होईल. ‘करून दाखवल्याची’ दवंडी पिटण्यासाठी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बुधवारीच हा लेकटॅपिंगचा कार्यक्रम आटोपण्यात आला.
कोयना धरणात २०१२ मध्ये झालेल्या लेक टॅपिंगमध्ये सहभागी असलेल्या राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रमुख अभियंता दीपक मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली मोडकसागरचा प्रयोग करण्यात आला. डायनामाइटचा स्फोट घडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी कळ दाबली तेव्हा काही सेकंदात प्रचंड मोठा आवाज होऊन जमिनीला हादरा बसला आणि बोगद्याच्या आउटलेटमधून धूर बाहेर येऊ लागला. मात्र कोयना धरणातील प्रयोगाप्रमाणे पाण्यावर कोणताही फुगवटा दिसला नाही. षटकोनी विहिरीतील बोगद्याच्या मुखातूनही पाणी येत नव्हते. त्यामुळे काही क्षण तणावाचे गेले. मात्र मिनिटभरात पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याचे दिसले आणि सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला. कोयनातील स्फोटात, साडेसहा मीटर व्यासाचे दोन बोगदे उघडण्यासाठी तब्बल १६०० किलो वजनाची स्फोटके वापरण्यात आली होती, मोडकसागरमध्ये तीन मीटर व्यासाच्या बोगद्यासाठी १८० किलो डायनामाइट वापरले गेले. स्फोटाची तीव्रता कमी असल्याने पूर्ण भरलेल्या तलावातील पाण्यात त्याचे पदसाद उमटले नसावेत, असे दीपक मोडक यांनी सांगितले. काही वेळा स्फोटामुळे उडालेले दगड तसेच धरणातील गाळ बोगद्यात साठल्याने पाण्याचा प्रवाह कमी अडण्याची शक्यता असते. बोगद्याची पाहणी केल्यावर गाळासंदर्भात निर्णय घेता येईल, असे ते म्हणाले.
मोडकसागर व अप्पर वैतरणा या धरणातील पाणी मुंबईत आणण्यासाठी एक विहीर व त्याला जोडणारे बोगदे पूर्वीपासून कार्यरत आहेत. मात्र नव्याने बांधलेले मध्य वैतरणा व प्रस्तावित गारगाई धरणातील पाणी आणण्यासाठी अतिरिक्त बोगद्याची गरज होती. यासाठी मध्य वैतरणा प्रकल्पाअंतर्गत पालिकेने १०४ मीटर खोलीची षटकोनी विहीर व १५६ मी., १४६ मी. उंचीवरील बोगद्यांचे काम केले होते. १३६ मीटर उंचीवरील बोगद्याचे मुख धरणात उघडण्यासाठी स्फोट करण्याचा प्रयोग मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. या लेक टॅपिंगमुळे तातडीने मोठा फायदा होणार नसला तरी शहराच्या पाण्याची गरज लक्षात घेता हा प्रयोग दूरगामी परिणाम करणारा ठरेल, असे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थिती
लेक टॅिपगच्या या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. मात्र नागपूर येथील धार्मिक कार्यक्रमाचे कारण देत फडणवीस गैरहजर राहिले. अमित शहा यांच्या महाराष्ट्र भेटीच्या पाश्र्वभूमीवर फडणवीस यांच्या अनुपस्थितीबाबत उलटसुलट चर्चा रंगली होती.
‘असाच स्फोट सेना घडवेल’
लेक टॅपिंगमधला स्फोट होऊन पाणी बोगद्यातून जायला सुरुवात झाले. मात्र या स्फोटाचा एकही बुडबुडा पाण्यावर आला नाही. कोणालाही काही कळले नाही. असाच स्फोट आम्ही महिन्याभरात करणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र हा स्फोट युतीतील मित्रपक्ष भाजपाच्या संदर्भात आहे की विधानसभा निवडणुकांबाबत, याचे स्पष्टीकरण करण्याचे मात्र त्यांनी टाळले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2014 रोजी प्रकाशित
मोडकसागरमध्ये लेक टॅपिंग यशस्वी
मोडकसागर तलावातून पाणी काढण्यासाठी खणण्यात आलेल्या बोगद्याचे धरणातील मुख सुरुंगस्फोटाने फोडण्याचा- लेक टॅपिंगचा प्रयोग बुधवारी झाला.
First published on: 04-09-2014 at 03:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lake tapping in modak sagar