सुशांत मोरे
खासगी प्रवासी वाहतूक ; बसगाडय़ांच्या दुरवस्थेमुळे फटका; ‘प्रवासी वाढवा’ अभियानही गुंडाळले
खासगी प्रवासी वाहतूकदारांची वाढलेली मक्तेदारी, वाढत जाणारे भाडे, बसगाडय़ांची दुरवस्था आदी कारणांमुळे गेल्या पाच वर्षांत १२ कोटी प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली आहे. पाच वर्षांपूर्वी साधारणपणे २५० कोटींच्या आसपास असलेल्या एसटीच्या प्रवासी संख्येने २०१८च्या पहिल्या सहा महिन्यांत ११५ कोटींचाच टप्पा गाठला आहे. प्रवासी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून एसटी महामंडळाने गेली काही वर्षे सुरू असलेले ‘प्रवासी वाढवा’ अभियानही गुंडाळले आहे. त्यामुळे एसटीचे प्रवासी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळाच्या उदासीनेतमुळे गेल्या पाच वर्षांत एसटीची पीछेहाटच होत आहे. २०१३-१४ मध्ये २५६ कोटींवर असलेली एसटीच्या प्रवाशांची संख्या २०१७-१८ मध्ये १२ कोटींनी कमी झाली आहे. त्यात एसटी महामंडळाने प्रवासी वाढवण्यासाठी कोणतेही ठोस उपक्रम राबविले नाहीत. २००५ साली सुरू केलेले प्रवासी वाढवा अभियान एसटीने गेल्या वर्षांपासून बंद केले. तसेच प्रवासी वाढविण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांसाठी घोषित केलेली बक्षीस योजनादेखील गुंडाळण्यात आली. प्रवासी किंवा उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहकांसाठी विशेष प्रोत्साहन योजना राबविणे विचाराधीन होते; परंतु त्याबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे चालक-वाहकांना प्रोत्साहित करून प्रवासी व उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीकडे सध्या कोणताही उपक्रम नाही. एसटीच्या याच उदासीनतेमुळे आणि गेल्या काही वर्षांत एसटीचे वाढलेले भाडे, त्या तुलनेत खासगी प्रवासी वाहतूकदारांचे कमी भाडे, बसगाडय़ांची दुरवस्था इत्यादींमुळे प्रवाशी एसटीकडे पाठ फिरवीत आहेत. २०१३-१४ मध्ये वर्षांला २५६ कोटी प्रवाशांनी एसटीने प्रवास केला होता. त्या वेळी दिवसाला सरासरी ७० लाख प्रवासी प्रवास करत होते. हा आकडा २०१७-१८ मध्ये ६६ लाखांवर घसरला आणि वर्षांची प्रवासी संख्या २४४ कोटींवर आली. २०१३-१४ च्या तुलनेत पाच वर्षांत एकूण बारा कोटी प्रवासी कमी झाले. २०१८च्या एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये ११५ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. एसटीने प्रवासी वाढवण्यासाठी उपक्रम न राबविल्यास मार्च २०१९ पर्यंत एकूण प्रवासी संख्येत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
जानेवारी ते मार्च या काळात गर्दी कमी असते. त्यामुळे प्रवासी वाढवा अभियान राबविले जात होते. पुन्हा हे अभियान सुरू करण्याचा विचार केला जाईल. यावर अवलंबून न राहता प्रवासी वाढवण्यासाठी प्रयत्न होतच असतात.
– रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ