ज्येष्ठ समीक्षक-साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळावरील त्यांच्या सदस्यपदाच्या नियुक्तीस नकार दिला आहे. वैयक्तिक कारणांसाठी मी हा नकार दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी विवाद्य व्यक्तीची नियुक्ती केली पाहिजे, अशी अपेक्षा साहित्यिक वर्तुळातून शुक्रवारी व्यक्त करण्यात आली. या मंडळाच्या अध्यक्षपदी बाबा भांड यांची नियुक्ती सरकारने केल्याबद्दल  बहुतांश साहित्यिकांनी  नाराजी व्यक्त केली.

साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी बाबा भांड यांच्या नियुक्तीमुळे साहित्य वर्तुळात नाराजी असून, या पदावर विवाद्य व्यक्तीची निवड केली पाहिजे, असे मत अनेक साहित्यिकांनी व्यक्त केले आहे.
साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यासाठीचे जे काही नियम किंवा प्रथा आहेत, त्यात प्रकाशकाची नियुक्ती करता येते किंवा नाही याबाबत मला माहिती नाही. पण एक व्यावसायिक प्रकाशक म्हणून बाबा भांड यांची मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करणे मला अनुचित वाटते. व्यावसायिक प्रकाशक म्हणून त्यांचे काही हितसंबंध असू शकतात, त्यामुळे हे योग्य नाही.
अरुण साधू

ग्रंथव्यवहाराशी संबंधित असलेल्या प्रकाशकाने सरकारच्या समिती किंवा मंडळाचे अध्यक्षपद घेऊ नये. अशा व्यक्तीने स्वत:हून ते पद सोडावे या मताचा मी आहे. अर्थात अशा महत्त्वाच्या पदावर काम करणारी प्रत्येक व्यक्ती भ्रष्टाचार करते असा दावा करता येणार नाही. पण ‘क्लॅश ऑफ इंटरेस्ट’ हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पूर्ण साधनशुचिता मानायची आहे अशा व्यक्तीने हे पद शक्यतो स्वीकारूच नये.
– मकरंद साठे

प्रकाशक एखाद्या समितीचा अध्यक्ष असेल म्हणून काही बिघडत नाही. प्रकाशन हा धंदा असेल तर लेखन हादेखील व्यवसाय आहे. अशा पद्धतीने आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहू लागलो, तर कोणतीच गोष्ट साध्य करता येणार नाही आणि लोकव्यवहार ठप्प होऊन जाईल.
डॉ. सदानंद मोरे

************
श्री. पु. भागवत यांच्यासारखे प्रकाशक हे जर साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असते, तर कोणाचा विरोध असण्याचे कारण नसते. त्यामुळे व्यक्ती कोणत्या क्षेत्रातील आहे यापेक्षाही प्रकाशन आणि संपादन क्षेत्रातील त्याचा अनुभव किती आणि दृष्टिकोन काय यावर सारे काही अवलंबून आहे. त्या व्यक्तीचा सारासार विवेक, ज्ञान आणि जागतिक बदलाची दृष्टी ठेवून मराठी ग्रंथव्यवहारामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता आहे का, या गोष्टी साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करताना ध्यानात घ्यायला हव्या होत्या.
– सतीश आळेकर
************
पूर्वकर्तृत्व असलेली निरपेक्ष वृत्तीची व्यक्ती आणि विवाद्य व्यक्तिमत्त्व असेल अशा व्यक्तीचीच महत्त्वाच्या पदावर निवड केली जावी. मग ती ग्रंथव्यवहारातील असली तरी हरकत नाही, पण सरकारने केलेली नियुक्ती ही वादातीत असली पाहिजे. श्री. पु. भागवत हयात असते आणि सरकारने त्यांची निवड केली असती, तर ते ग्रंथव्यवहारातील असूनही त्यांच्या हेतूबद्दल कोणी शंका घेतली नसती. एखाद्याविषयी प्रवाद किंवा माफक संशयही नाही अशाच व्यक्तीची नेमणूक करायला हवी. स्वच्छ प्रतिमा महत्त्वाची वाटते. एक वेळ गुणवत्ता कमी असली तरी चालेल, पण त्या व्यक्तीची सर्वमान्यता महत्त्वाची आहे.
– मंगला गोडबोले
************
ग्रंथव्यवहाराशी दूरान्वयानेही संबंध येणारी व्यक्ती महत्त्वाच्या पदावर नसावी. एरवी बाबा भांड यांच्याविषयीचे माझे खूपच छान मत होते. मात्र, त्यांची नियुक्ती होताच २० वर्षांपूर्वीचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आले. एवढय़ा वर्षांत त्याची चौकशी व्हायला हवी होती. मात्र सरकारनेही एखाद्या व्यक्तीची नेमणूक करताना या मुद्दय़ाकडे लक्ष द्यायला हवे. खडू-फळा प्रकरण माझ्याबाबतीत घडले असते तर मी हे पद स्वीकारले नसते.
 – विद्या बाळ
************
या वादात सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया मला व्यक्त करायची नाही. पण लवकरच माझी भूमिका मी लेखाद्वारे स्वतंत्रपणे मांडेन.
– मधु मंगेश कर्णिक
************
बाबा भांड यांच्या नियुक्तीबाबत चांगली किंवा वाईट मी कोणतीच प्रतिक्रिया देत नाही.
– डॉ. विजया राजाध्यक्ष  
************
ग्रंथव्यवहाराशी संबंधित असलेले प्रकाशक सरकारच्या समिती किंवा मंडळाचे अध्यक्ष असण्यास हरकत नाही. मात्र, बाबा भांड त्या पदावर असू नयेत. हे सगळे लाजिरवाणे आहे. या प्रकरणामध्ये चूक सरकारी प्रशासन व्यवस्थेची आहे. खडू-फळा प्रकरणातील घोटाळा माहीत असूनही या व्यक्तीची पदावर नियुक्ती केली जाते याचे आश्चर्य वाटते.
– डॉ. सु. रा. चुनेकर
या मंडळाचा अध्यक्ष प्रकाशक होऊ शकतो का, या सर्व तांत्रिक बाजू आहेत आणि त्याची मला माहिती नाही. राज्य सरकारने अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली असल्याने तेच या संदर्भातील बाबी तपासून बघतील.
– आशा बगे
************
बाबा भांड हे प्रकाशक असल्यामुळे त्यांची नियुक्ती साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी का केली, हे मला उमगले नाही आणि त्याचा अर्थही कळला नाही. प्रकाशक हा मंडळाचा अध्यक्ष होऊ शकतो, याबाबत मला माहिती नाही.
– डॉ. आशा सावदेकर
************
प्रकाशकांची नियुक्ती करू नये असा काही नियम असेल, असे मला वाटत नाही. बाबा भांड लेखक आणि चांगले साहित्यिक आहेत. त्यामुळे त्यांना डावलणे योग्य नाही. साकेत प्रकाशनला त्यांनी लौकिक मिळवून दिला आहे. त्यांच्यावर जे काही आरोप लावण्यात आले आहे ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर बोलणे योग्य नाही. प्रकाशकांमध्ये अनेक गट आहेत. त्यामुळे त्यांना विरोध होऊ शकतो. राज्य सरकारने त्यांची नियुक्ती करताना त्यांच्यातील लेखक बघितला असू शकतो. त्यामुळेच त्यांची नियुक्ती केली आहे.
 – डॉ. यशवंत मनोहर
************
एखाद्या प्रकाशन संस्थेचा प्रकाशक हा या मंडळावर अध्यक्ष असावा की नसावा, हा निर्णय राज्य सरकारचा आहे. प्रकाशकांनी सरकारच्या एखाद्या संस्थेचा अध्यक्ष होऊ नये, असे कुठे नमूद आहे का ते तपासून बघितले पाहिजे. सरकारचे त्याबाबत धोरण काय आहे, त्यांच्या नियमात ते आहे का, या सर्व गोष्टींची शहानिशा केली पाहिजे आणि सरकारने ती केली असेल म्हणून भांड यांची नियुक्ती केली असावी.
साहित्याशी संबंधित वाचक, प्रकाशक, लेखक, समीक्षक, मुद्रक हे जे सर्व घटक आहेत त्या सर्वाना अधिकार आहे. मात्र अध्यक्षपदावर गेल्यानंतर त्यांनी सकारात्मक पद्धतीने काम करण्याची गरज आहे. त्यावर सरकारनेही लक्ष देणे गरजेचे आहे. बाबा भांड यांच्यावर काही आरोप आहेत ते १९९५ मधील आहेत. ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर बोलणे उचित नाही.
– मनोहर म्हैसाळकर
************
बाबा भांड हे पहिले लेखक आहेत आणि त्यानंतर ते प्रकाशक म्हणून समोर आले आहेत. प्रकाशन हा त्यांचा व्यवसाय आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू असू शकतात. साहित्यात दोन गोष्टी वेगवेगळ्या करू शकत नाही. लेखकाला जेवढा सन्मान असतो तेवढा प्रकाशकाला असतो. राज्य सरकारने त्यांची निवड प्रकाशक म्हणून केली की लेखक, ते मात्र बघावे लागेल. मात्र, असे असले तरी प्रकाशक हा एखाद्या मंडळाचा अध्यक्ष होऊ शकत नाही, असे काही नाही. सध्या साकेत प्रकाशन व्यवसाय त्यांचा मुलगा सांभाळत आहे.
डॉ. रवींद्र शोभणे

या संदर्भात ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना विचारल्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.