मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची बस ही सर्वसामान्य प्रवाशांची लालपरी आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित असल्याने एसटी महामंडळ आणि एसटी कर्मचाऱ्यांवर प्रवाशांचा गाढा विश्वास आहे. कमी दरात सेवा देणारी लालपरी प्रवाशांच्या जीवाभावाची आहे. दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, पंढरपूरची वारी व कोणत्याही सण – उत्सवासाठी प्रवाशांच्या सेवेत एसटी तत्पर असते. त्यामुळे एसटीचे प्रवासी हेच कुटुंब समजून, प्रवाशांसह एसटी कर्मचारी दिवाळी, भाऊबीज साजरी करतात. गेली १५ वर्षे दिवाळीत घरापासून लांब राहून, चालक अनंत कराड प्रवाशांच्या सेवेत राहून, प्रवाशांच्या आनंदात समाधान मानत आहेत.

अहिल्यानगरमधील पाथर्डीमधील अनंत कराड हे पुण्यातील शिरुर आगारात २०११ साली चालक या पदावर रुजू झाले. ज्यादिवसापासून चालकाची खाकी वर्दी अंगात घातली त्यावेळेपासून झटून काम करण्यास सुरुवात केली. दरवर्षी ते दिवाळी ही कुटुंबियांपासून दूर राहून, मुलांच्या हट्टाकडे दुर्लक्ष करून, राज्यातील कोणत्याही आगारात कर्तव्य बजावत होते. दरदिवाळी गावापासून, शिरुर आगारापासून लांब सेवा बजावत होते. यावर्षीही कराड हे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आगारात कर्तव्य बजावत आहेत.

वर्षभर कुटुंबियांपासून लांब राहून काम करून, दिवाळी सणानिमित्त कुटुंबियांना भेटण्यासाठी अनेकजण गावी येतात. कुटुंबियांसोबत सण साजरा करतात, जल्लोष करतात. तसेच शाळा, महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या की, मुले मामाच्या, नातेवाईकांच्या गावी जातात. परंतु, ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी कुटुंबापासून दूर राहून, एसटी प्रवाशांची सेवा करतात.

गावातून शहरात आणि शहरातून गावात जाणाऱ्या प्रवाशांना एसटीने सोडण्याचे काम करतात. यावेळी एसटी महामंडळामधील सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या जातात. ९९ टक्के कर्मचारी बाहेरील आगारात कर्तव्य बजावतात. चालक कराड गेली १५ वर्षे दिवाळीच्या पाचही दिवशी घरी न थांबता, सुट्टी न घेता, एसटी प्रवाशांची ने-आण करत आहेत.

एसटीच्या आगारातील स्थानिक कर्मचाऱ्यांसह दिवाळी साजरी केली जाते. स्थानिक कर्मचारी मुक्कामासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अंघोळीचे गरम पाणी, सुगंधी उटणे, सुवासिक साबण देतात. लक्ष्मीपूजनाच्या दिनी लक्ष्मीचा फोटो आणणे, हार घालणे, पूजापाठ करणे सुरू असते. तसेच फराळाची देवाणघेवाण केली जाते. कमी आवाजाचे फटाके फोडून दिवाळीचा जल्लोष कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला जातो. काही सेवानिवृत्त कर्मचारी एसटी आगारात येऊन कर्मचाऱ्यांसह दिवाळी साजरा करतात. स्थानिक कर्मचारी मुक्कामी आलेल्या कर्मचाऱ्यांची खूप चांगली सेवा करतात, काळजी घेतात. मग काही कर्मचारी आपले मनोगत व्यक्त करतात. यावेळी अनेकांना कुटुंबियांची आठवण येऊन भरून येते, असे कराड यांनी सांगितले.

दिवाळी ही साधारण एका आठवड्याची असते. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त साधारणपणे तीन आठवडे काम करावे लागते. दिवाळी येण्याच्या आधीच्या आठवड्यात आणि दिवाळीच्या आठवड्यात प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याचे काम केले जाते. तर, दिवाळी झाल्यानंतरच्या आठवड्यात पुन्हा गावावरून शहरात प्रवाशांना सोडावे लागते. त्यामुळे तीन आठवडे कुटुंबियापासून दुरावा राहतो. प्रवाशांना सुरक्षित आणि सुखदायक प्रवास झाल्यानंतर घरी जाऊन, दिवाळी संपल्यानंतर, एसटी कर्मचारी दिवाळी साजरा करतो, असे कराड यांनी सांगितले.

कराड यांच्या पाथर्डी या गावी आई-वडील, आजी-आजोबा, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावाची पत्नी आणि त्यांची दोन मुले असा मोठा परिवार आहे. आता कराड यांची मुले मोठी झाली आहेत. पण मुले लहान असताना, दिवाळीत कामावर न जाण्याचा हट्ट करायची. त्याचा बालहट्ट पूर्ण करू शकलो नाही. एसटीचे प्रवासी हेच आमचे कुटूंब मानून, प्रत्येक बहीण-भावाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी, त्यांना योग्यरित्या घरी सोडवायचे काम केले आहे. प्रत्येक एसटी चालक-वाहक करत आहे, अशी भावना कराड यांनी व्यक्त केली.