मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘फोर्स वन’ या कमांडो दलाच्या गोरेगाव येथील गोळीबाराचा सराव करावयाच्या क्षेत्रातील मुख्य बांधकाम काम सुरू असतानाच कोसळल्यामुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळाचे महासंचालक अरुप पटनाईक यांनी चौकशीचे तसेच सल्लागाराचे शुल्क थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
संभाव्य दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज करण्यात आलेल्या ‘फोर्स वन’ या कमांडो दलाला हक्काची जागा मिळण्यातच अनेक वर्षे निघून गेली. एकीकडे केंद्र सरकारच्या ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ला तात्काळ जागा मिळून त्यांनी मुंबईत जमही बसविला.तर ‘फोर्स वन’ अद्याप कार्यान्वित झालेले नाही. त्यातच अडीच कोटी खर्चाची फायरिंग रेंजची भिंत कोसळल्यामुळे खळबळ माजली आहे. ‘फोर्स वन’चे प्रमुख रजनीश शेठ यांनी ही फायरिंग रेंज अद्याप फोर्सवनकडे सुपूर्द करण्यात आलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
‘फोर्स (की फार्स) वन’
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यास १५ मिनिटांत चोख उत्तर देण्याची अपेक्षा ‘फोर्स वन’कडून व्यक्त केली जात आहे. मात्र असे तात्काळ उत्तर देण्यासाठी यंत्रणा नाही.यासाठी गृहखात्याकडून हात मात्र आखडता घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.