मुंबईतील दहिसर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राने शंभर रुपये घेतले आणि ते परत देत नसल्यामुळे झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आलीय. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने ही हत्या केली तिनेच फोन करुन पोलिसांना चुकीची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तपासानंतर आरोपीला अटक केलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परमेश्वर कोकाटे या तरुणाने ४ फेब्रुवारी रोजी रात्री १२ च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली. गॅरेजमध्ये एक व्यक्ती जळलेल्या अवस्थेत पडल्याची माहिती परमेश्वरने दिली. महिती मिळताच लगेच दहिसर पोलीस स्थानकातील पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालामध्ये गळा अवळल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे मृत व्यक्तीसोबत घडलेला प्रकार हा अपघात नसून हत्या असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली.

पोलीस चौकशीदरम्यान पोलीस नियंत्रण कक्षामध्ये फोन करणारा मित्र परमेश्वर कोकाटे यानेच राजू पाटील याची हत्या केल्याची माहिती समोर आली. राजू आणि परमेश्वर ४ फेब्रुवारीच्या रात्री गॅरेजमध्ये बसले होते. या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी १०० रुपये देण्याघेण्यासंदर्भातील व्यवहारावरुन वाद झाला. या दोघांमध्ये झटापटी झाली. त्यामध्ये परमेश्वरने संतापून तेथेच पडलेल्या प्लॅस्टीकच्या नळीने राजूचा गळा आवळून त्याची हत्या केली.

पुरावे नष्ट करण्यासाठी राजू जळल्याचा बनाव परमेश्वरने रचला होता. मात्र पोलिसांनी आता परमेश्वरला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला नऊ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिलीय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man killed his friend over fight of 100 rs scsg