दहावीपर्यंत रत्नागिरीत शिक्षण घेतलेला एक विद्यार्थी औषधनिर्माणशास्त्रात पदवी प्राप्त करतो आणि उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जातो. तेथे स्वकष्टावर कंपनी उभारतो. केवळ कंपनीची उभारणीच नव्हे तर जगभर तिचा विस्तारही करतो. एका अनमोल शोधासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते त्याचा सन्मानही होतो.. ही यशोगाथा आहे निर्मल मुळे यांची. इंधनबचतीसाठी त्यांनी तयार केलेल्या इंजेक्टरला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. सिक्युअरिंग अमेरिकाज् फ्युचर एनर्जी (सेफ) या पुरस्कारावर स्वतच्या नावाची मोहोर उमटवणारे मुळे हे पहिले भारतीय ठरले आहेत.
इराक युद्धानंतर तेलाच्या साठय़ांची महती अमेरिकेला समजली. त्यामुळे भूगर्भातील इंधनाच्या या अमूल्य साठय़ांची जपणूक व्हावी, त्यासाठी अधिकाधिक संशोधन व्हावे या उद्देशाने संशोधकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘सेफ’चा पुरस्कार सुरू करण्यात आला. निर्मल यांनी गाडय़ांमध्ये इंधनासाठी वापरण्यात येणारे इंजेक्टर नव्या पद्धतीने तयार केले आहे. या इंजेक्टरमुळे २० टक्केइंधन बचत होत असल्याचा दावा त्यांनी केला. विविध आंतरराष्ट्रीय कसोटय़ांवर हा दावा पडताळून पाहिल्यानंतर याचे पेटंट मुळे यांना मिळाले. त्यांच्या या संशोधनाची दखल ‘सेफ’ पुरस्कारासाठी घेण्यात आली. हा पुरस्कार दरवर्षी अमेरिकेच्या अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. मुळे यांनी शोधलेले हे इंजेक्टर अल्प दरात उपलब्ध होणार असल्याने ते लवकरच बाजारात येण्याची आशा आहे.
प्रेरणा अशी मिळाली
१९९२ मध्ये पीएचडी अभ्यासक्रमासाठी अमेरिकेत निवासाला असताना एकदा मुळे यांच्या घरी प्लम्बिंगचे काम निघाले. प्लम्बिंगच्या या कामासाठी प्लम्बरने त्यांच्याकडून ८५ डॉलर घेतले. त्याचवेळी मुळे यांनी स्वतची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांतच त्यांनी ‘नॉस्टर्म एनर्जी एलएलसी’ कंपनीची स्थापना केली. औषधांची सूत्रे तयार करून ती विविध औषध कंपन्यांना विकायची व मानधन मिळवायचे हा व्यवसाय सुरू झाला. २००१ मध्ये अंधेरीत कंपनीची शाखा सुरू केली. जर्मनीतील रेशो फॉर्मा या नामांकित कंपनीची अमेरिकेतली शाखा विकत घेतली व तिथे उत्पादन सुरू केले. यादरम्यान इंधनावर त्यांचे संशोधन सुरूच होते. त्यातूनच त्यांनी या नव्या इंजेक्टरचा शोध लावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi formula to save fuel nirmal mule felicitated in america