गणेश कार्यशाळेत गणेशमूर्तीची निर्मिती; जिद्दीने अडचणींवर मात

नशिबाने मतिमंदत्व  आले असले तरी सुयोग पाटीलसारख्या चार मुलांनी त्यावर आपल्या जिद्दीने मात केली आहे. पेणच्या सुहित ट्रस्टमधील या मुलांनी गणेश कार्यशाळेत बुद्धिदात्याची मूर्ती घडवीत त्यावर रंगांचाही साज चढविला आहे. त्यातून त्यांनी ‘स्वकमाईचा’ही श्रीगणेशा केला असून सुयोगसारख्या गुणी मुलाच्या पावलावर पाऊल टाकून अन्य मुलेही मूर्तिकला व रंगकामात तरबेज होत आहेत.

लाजराबुजरा अकरा वर्षांचा मध्यम स्वरूपाचे मतिमंदत्व असलेला सुयोग काही वर्षांपूर्वी सुहित ट्रस्टच्या संचालिका डॉ. सुरेखा पाटील यांच्याकडे आला. त्याचे वडील पेण अर्बन बँकेत नोकरीस होते व रामवाडीत हॉटेलही होते. पण पेण अर्बन बँक पडली आणि रस्ता रुंदीकरणात सुयोगच्या वडिलांचे हॉटेल व घरही गेले. त्यामुळे कुटुंबावर अरिष्ट कोसळले व त्याचा परिणाम सुयोगवरही झाला. पण डॉ. पाटील, संस्थेतील शिक्षक व इतरांनी बरेच प्रयत्न केले. सर्व अडचणींवर मात करून सुयोग व्यावसायिक प्रशिक्षणही घेऊ लागला. पेण येथे गणपती बनविण्याचा कारखाना चालविणारे दीपक समेळ यांचा मुलगा सचिन याने सुहित ट्रस्टच्या शाळेला काही महिन्यांपूर्वी भेट दिली. तेव्हा मुलांमधील गुण हेरून सुयोग व चार मुलांना अर्धवेळ मूर्तिकार प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. मूर्ती घडविण्याबरोबरच रंगांचाही साज चढविण्याचे कसब सुयोगसह चार मुलांनी आत्मसात केले आहे.

सुयोग क्रिकेटही चांगला खेळतो आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी वांद्रे येथे एका सराव शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले होते. दुर्दैवाने मतिमंदत्व आले असले तरी त्याचा समर्थपणे मुकाबला करून आपल्या पंखांमध्ये बळ वाढवून भरारी घेण्याचा प्रयत्न सुयोगसारखी मुले करीत आहेत, याबाबत डॉ. पाटील यांनी आनंद व्यक्त केला. शासनाने अपंगांना तीन टक्के आरक्षण दिले असले तरी मतिमंदत्वाचा समावेश त्यात केलेला नसल्याने या मुलांपुढे रोजगाराच्या अडचणी आहेत. मात्र तरीही जिद्दीने अडचणींना दूर सारून सुयोगसारखी मुले प्रकाशवाटा चोखाळत आहेत.