मुंबई परिसरासाठीच्या ‘एमएमआरडीए’ च्या धर्तीवर ‘पीएमआरडीए’ ची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून भूसंपादनासाठी ‘चटईक्षेत्र निर्देशांक धोरण’ (टीडीआर पॉलिसी) निश्चित केली जाणार आहे. मुंबईत किनारपट्टी रस्त्यालगत सार्वजनिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका (बीआरटीएस) आणि मेट्रो रेल्वेही सुरु करण्याचे प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी २०१७ हे वर्ष ‘व्हिजीट महाराष्ट्र’ म्हणून साजरे केले जाणार असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा जाहीर केला आहे.
मुंबईतील शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्गासाठी ११,३७० कोटी रुपयांचे कर्ज ‘जायका’ या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेकडून घेण्यासाठी केंद्र सरकारने ना हरकत परवानगी दिली आहे. तर पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी चार टीडीआर मंजूर असूनही विकासक पुढे यावेत, यासाठी एक तृतीयांश जागा व्यावसायिक वापराने देण्यासही परवानगी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नवी मुंबई विमानतळासाठीची निविदा मे २०१५ अखेपर्यंत काढली जाईल, ऑक्टोबरपासून कामाला सुरुवात होईल आणि २०१९ मध्ये विमानतळाचा वापर सुरु होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
नगरविकास, पर्यटन खात्यांच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत अनेक निर्णयांची घोषणा केली.
मुंबई व परिसरासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून विकास प्रकल्प राबविले जातात. आता पुणे परिसरासाठीही पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण ही नवीन यंत्रणा उभारली जाणार असून विकास प्रकल्प मार्गी लावले जातील. जमिनीच्या वापरात बदल (चेंज ऑफ यूजर) करावयाचा असल्यास जिल्हाधिकाऱ्यांना दोन एकपर्यंत अधिकार देण्यात आला असून त्यावरील जमिनीसाठीचा अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नगरविकास
*वीजबिल न भरल्याने बंद पडलेल्या पाणीउपसा योजना सुरु करणार
*गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या आराखडय़ास मान्यता
*वडाळा-कासारवडवलीस लवकरच मान्यता देणार
*५०० चौ.फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिकेस मालमत्ताकर नाही
पर्यटन
*सिंधुदुर्गातील ‘सी वर्ल्ड’ प्रकल्पासाठी १२० कोटी रुपयांची तरदूर, भूमी अधिग्रहण पूर्ण
*एरंगळ, वेंगुर्ला येथे मच्छिमार खेडे विकसित करणार
*ताडोबा व कोकणात पर्यटन वसाहती, अष्टविनायक बाबत केंद्राकडे प्रस्ताव
*कुंभमेळ्यासाठी ३५० कोटी रुपये
*रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी एकात्मिक पर्यटन आराखडा
*अजिंठा, वेरुळ विकासासाठी ‘जायका’ कडून ९२० कोटींचे कर्ज