मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी पाच वेळा समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर न राहणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात महानगर दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महानगरदंडाधिकाऱ्यांकडे धाव घेत भारतीय दंडविधानाच्या कलम १७४ नुसार लोकसेवकाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी देशमुखांविरोधात कारवाईची मागणी केली होती. ‘ईडी’ने कारवाईची मागणी केलेल्या कलमाअंतर्गत एक महिन्यापर्यंतचा साधा कारावास वा पाचशे रुपयांचा दंड किंवा दोन्हीच्या शिक्षेची तरतूद आहे. ईडीच्या अर्जावरील शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी देशमुखांना किती वेळा समन्स बजावण्यात आले व त्यातील एक समन्स त्यांनी स्वत: स्वीकारल्याची माहिती ईडीतर्फे न्यायालयाला देण्यात आली.

त्यावर देशमुख यांनी स्वत:, तसेच त्यांची मुलगी व वकिलाने त्यांच्यावतीने ईडीने बजावलेले समन्स स्वीकारले होते. त्यानंतरही  देशमुख यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे देशमुखांवर लोकसेवकाच्या  आदेशाचे पालन न केल्याचे ईडीचे म्हणणे सकृतदर्शनी योग्य असल्याचे नमूद करत अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी आर. एम. नेरलीकर यांनी देशमुख यांना समन्स बजावत १६ नोव्हेंबरला हजर जाण्याचे आदेश दिले.