बटवडय़ासाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने टपाल कार्यालयात बरेच दिवस पडून राहिलेली आधार कार्ड उंदरांनी कुरडतल्याचा प्रकार बदलापूरमध्ये उघडकीस आला आहे.
बदलापूर येथील टपाल कार्यालयात ३ ऑगस्ट रोजी आधार कार्ड वितरणासाठी आली. मात्र शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील टपाल कार्यालयाचे कर्मचारी आहे. त्यामुळे येथे बटवडा करण्यास विलंब होतो. आधार कार्डाच्या बाबतीतही तसेच झाले. तब्बल २० दिवस कार्ड टपाल कार्यालयात पडून राहिली. शुक्रवारी सकाळी त्यांचे वाटप सुरू झाले असता त्यातील काही कार्ड उंदरांनी कुरतडल्याची बाब भाजपचे शहर चिटणीस अरुण खानोलकर यांच्या लक्षात आली.
विशाखा रुद्र आणि शैला केळकर यांची आधार कार्डे कुरतडण्यात आली. त्यात महत्त्वाचे क्रमांक तसेच छायाचित्रांचा काही भाग गायब झाला आहे. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी टपाल कार्यालयास भेट देऊन पाहणी केली असता आणखी काही कार्ड कुरतडण्यात आल्याचे त्यांच्या निर्दशनास आले.