लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात उध्दव आणि राज ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक खोचक टीकांचे पडसाद आज मुंबईतील ओल्ड कस्टम हाऊस बाहेर उमटले. 
कस्टम हाऊसजवळ शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) उमेदवार आदित्य शिरोडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
ओल्ड कस्टम हाऊसजवळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या पाठिंब्यासाठी जमले होते. दरम्यान, एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू होती. यात एकमेकांना चिथविण्याचा प्रयत्न सुरू झाला त्यानंतर याचे रुपांतर दगडफेकीत झाले. हाणामारीचाही प्रकार घडला आहे.
त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी पत्रकारांवरही हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यात एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनलाही दुखापत झाली आहे.