मनसेच्या उपशहर अध्यक्षपदी दोन दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आलेल्या दत्ता घंगाळे याला सीवूड पोलिसांनी आज माथाडी कामगार नेते बाळासाहेब चौधरी यांच्या हत्या प्रकरणात अटक केली. त्यामुळे मनसेची नवनियुक्त कार्यकारणी वादग्रस्त ठरली आहे.
माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष व वाहतूक कंत्राटदार बाळासाहेब चौधरी यांची २४ जूनला सीवूड येथील एल अ‍ॅण्ड टी उड्डाणपुलाजवळ निर्घृण हत्या झाली होती. त्या प्रकरणात त्यांचा शेजारी विकास औटी याला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अटक केली होती. औटी हा पूर्वी चौधरी यांच्या संघटनेत काम करीत होता, पण काही कारणास्तव त्याला संघटनेतून काढून टाकण्यात आले होते. त्याचा राग मनात ठेवून औटी याने चौधरी यांची चाकूने वार करून हत्या केली. या प्रकणात औटी याने दिलेल्या जबानीवरून सीवूड पोलिसांनी आज घंगाळे याला बेडय़ा ठोकल्या. औटी चौधरीकडून निघाल्यानंतर घंगाळे याच्याकडे काम करीत होता.