कळव्यातील पारसिक बोगद्याजवळील वाघोबानगरमध्ये एका  इसमाने आपल्या पोटच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीला आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, १७ वर्षे वयाची ही मुलगी आपल्या वडिलांसोबत राहते. तिची आई सुरत येथे गेली आहे. हा इसम आपल्या मुलीशी शारीरिक लगट करून तिचा विनयभंग करीत होता. विरोध करूनही वडील ऐकत नसल्याने अखेर या मुलीने धाडसाने कळवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ या वडिलांना अटक केली आहे.
मित्राकडून विनयभंग
विठ्ठलवाडी बाजारपेठेत विनेश नारायण या तरुणाने आपल्या मैत्रिणीचा विनयभंग केला.  त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
विनेश त्याच्या मैत्रिणीसह विठ्ठलवाडी बाजारपेठेत खरेदीसाठी आला होता. या वेळी विनेशने मैत्रिणीला थांबण्यास सांगितले. तिने त्याची दखल घेतली नाही म्हणून विनेशने तिच्याविषयी अश्लील शब्द वापरून तिचा हात पकडून विनयभंग केला. विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
डॉक्टरकडून  विनयभंग
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगरमधील एका डॉक्टरने आपल्या मदतनीस अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केला आहे. डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, डॉ. मनोज प्रसाद ( ३७) यांचा सुनीलनगरमधील गणनायक सोसायटीत प्रियांका क्लिनिक नावाने दवाखाना आहे. गेल्या दोन महिन्यांपासून एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली १७ वर्षांची तरुणी त्यांच्या दवाखान्यात मदतनीस म्हणून काम करीत होती.
गेल्या महिन्यात रात्रीच्या वेळेत डॉ. मनोजने दवाखान्यात या तरुणीबरोबर अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. शनिवारी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. मनोजला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये शिवाजी चौकातील एका डॉक्टरने दवाखान्यातील परिचारिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Molestation by father in kalwa