मुंबई : चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याची नामुष्की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) ओढावली आहे. त्यामुळे आता मोनोरेल प्रकल्प कसा तोट्यात सुरू आहे, प्रकल्प कसा पांढरा हत्ती ठरत आहे याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. मोनोरेल प्रकल्पासाठी होणार खर्च आणि त्यातून मिळणारा महसूल यात प्रचंड तफावत आहे.
२०१४ ते २०२२ या आठ वर्षांमध्ये २९.७३ कोटी रुपये महसूल एमएमआरडीएला मिळाला. मात्र त्याचवेळी ३४३ कोटी रुपये खर्च झाला आहे. खर्चाच्या तुलनेत ८.६५ टक्के इतका महसूल मिळाला आहे. मोनोरेलचे आधुनिकीकरण करून प्रवासी संख्या वाढविण्यासाठी सेवा काही काळासाठी बंद केल्याचीही चर्चा आहे.
एमएमआरडीएच्या २० किमी लांबीच्या मोनोरेल मार्गिकेला मुंबईकरांची पंसती मिळत नसल्याने तिकिटातून एमएमआरडीएला उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या मोनोरेल मार्गिकेवरून दिवसाला अंदाजे १९ हजार प्रवासी प्रवास करतात. ही संख्या खूपच कमी आहे. दुसरीकडे मात्र मोनोरेल मार्गिकेच्या संचलन, देखभाल, दुरुस्तीवर प्रचंड खर्च होत आहे.
२०१४ ते २०२२ या काळात मोनोरेलवर ३४३ कोटी रुपये खर्च झाला आहे. तर यातून केवळ २९.७३ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. उत्पन्न आणि महसूल यातील तफावतीमुळे तोटा वाढत आहे. या मार्गिकेचा २०२२-२३ मधील तोटा तब्बल २५० कोटी रुपये आहे. तर २०२३-२४ मध्ये तोटा ५२९ कोटी रुपयांच्या घरात गेला होता.
२०२४-२५ मधील तोट्याची रक्कम उपलब्ध नसली तरी तोही बराच मोठी असण्याची शक्यता आहे. मोनोला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडून प्रयत्न केले जात आहेत. आता मोनोरेल सेवा काही काळासाठी बंद करून प्रकल्पाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. मात्र त्यानतंरही मोनोरेल तोट्यातून बाहेर येईल का हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
आठ वर्षातील उत्पन्न आणि खर्चाचा ताळेबंद
वर्ष – उत्पन्न (कोटीत) – खर्च (कोटीत)
२०१४-१५ – ४.२० – १८.८६
२०१५-१६ – ४.३६ – २१.५८
२०१६-१७ – ४.११ – २०.४७
२०१७-१८ – २.३३ – १७.९९
२०१८-१९ – २.५४ – २०.२३
२०१९-२० – ७.०५ – ९४.३४
२०२०-२१ – १.०३ – ८१.६१
२०२१-२२ – २.६५ – ६८.२७