मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात ‘एमएमआरडीए’तर्फे बांधण्यात आलेल्या पूर्व मुक्त मार्गाच्या खर्चात २५८.८७५ कोटी रुपयांची वाढ झाली असून प्रकल्पाचा एकूण खर्च ११०६.३७७ कोटी रुपयांवर गेला आहे. प्रकल्पाचा मूळ खर्च ८४७.५२ कोटी रुपये इतका होता. प्रकल्पासाठी सल्लागारावर २४.७१ कोटी रुपयांची खैरात करण्यात आली असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.
हा प्रकल्प १६.५९ किलोमीटर लांबीचा असून तो तीन टप्प्यात विभागण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय ते आणिक जंक्शनपर्यंतचा टप्पा गेल्यावर्षी १४ जून रोजी वाहतुकीस खुला करण्यात आला. मिठागर जमिनीलगतचा ७०० मीटर मार्ग आणि माहुल खाडीवरील दोन पूल यांचे काम मे २०१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.१८ जानेवारी २०११ मध्ये ते काम पूर्ण व्हायला पाहिजे होते. २९ महिने विलंब तर झालाच पण ५३१ कोटी रुपये किंमतीवरून हा प्रकल्प ५९०. ८९७ कोटी रुपयांवर पोहोचला.
दुसऱ्या टप्प्यातील आणिक पांजरपोळ जोडरस्ता २४ एप्रिल २००७ पर्यंत पूर्ण व्हायला हवा होता. १४ जून २०१३ रोजी तो वाहतुकीस खुला करण्यात आला. माहुल खाडीवरील सव्र्हिस पुलाचे काम अद्यापही सुरू आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत १४८.५० कोटी रुपये इतकी होती. ती २२१.६४ कोटी झाली आहे.
तिसऱ्या टप्प्यातील पांजरपोळ घाटकोपर जोडरस्ता प्रकल्पाचे काम २८ फेब्रुवारी २०११ पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते. वाढीव मुदत ३१ डिसेंबर २०१३ ही ठरली तर वाढीव किंमत २९३.८४ कोटी रुपये इतकी झाली. प्रत्यक्षात मूळ किंमत १६८.०२ इतकी होती, अशी माहिती माहितीच्या अधिकारात अनिल गलगली यांनी ‘एमएमआरडीए’कडून मिळविली आहे. तिसरा टप्पाा वाढीव मुदतीपेक्षाही सहा महिन्यांनंतर, सोमवारपासून सुरू झाला.
या दिरंगाईबद्दल ‘एमएमआरडीए’ने कंत्राटदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट प्रकल्पाच्या मूळ खर्चात २५९ कोटी रुपयांची वाढ करून कंत्राटदाराचे भले करून सरकारचे नुकसान केले आहे, अशी टीका गलगली यांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2014 रोजी प्रकाशित
पूर्व मुक्त मार्गाच्या खर्चात २५८.८७५ कोटींची वाढ
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात ‘एमएमआरडीए’तर्फे बांधण्यात आलेल्या पूर्व मुक्त मार्गाच्या खर्चात २५८.८७५ कोटी रुपयांची वाढ झाली असून प्रकल्पाचा एकूण खर्च ११०६.३७७ कोटी रुपयांवर गेला आहे.
First published on: 17-06-2014 at 03:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai eastern freeway costs increased by rs 258 875 core