मर्डर मिस्ट्री असणारी वेबमालिका तयार करणे हे आता नवे राहिलेले नाही. पण त्या हत्येभोवतीच्या सामाजिक परिस्थितीचं विश्व नीट उभं केलं तर त्या कथेला काहीतरी अर्थ गवसतो. ‘सर्च – द नैना मर्डर केस’ ही जिओ हॉटस्टारवर आलेल्या नव्या मालिकेचे कथानक एका तरुण विद्यार्थिनीच्या हत्येच्या तपासाभोवती फिरते, तरी त्यासह जेन झी पिढीच्या विश्वात काय सुरू असते, या पिढीचे त्यांच्या पालकांशी असलेले मतभेद आणि एका पोलीस बाईची आणि आईची घालमेल अत्यंत परिणामकारकरित्या या मालिकेत दिसते.

एक नेहमीच्या सरधोपटपणातला बदल म्हणजे ही कथा मुंबईत नव्हे तर चक्क नवी मुंबईत घडते. सहाय्यक पोलीस आयुक्त संयुक्ता दास (कोंकणा सेन शर्मा) ही एक सक्षम, यशस्वी पोलीस अधिकारी आहे. पण आपला मोडता मोडता राहिलेला संसार सावरण्यासाठी तिने या यशस्वी कारकीर्दीवर पाणी सोडण्याची तयारी दाखवत अहमदाबादची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे सायबर गुन्हे शाखेत प्रशिक्षण देण्याचं काम स्वीकारण्याची मानसिकताही तिने तयार केली आहे. तेथे जाण्याच्या तयारीत असतानाच शहरात एका तरुणीची हत्या होते. नैना मराठे हिच्या हत्येच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त जय कंवल (सूर्या शर्मा) याची नियुक्ती होऊनही या केसची जबाबदारी संयुक्तावर येते. जय हाही तिच्यापेक्षा वयाने लहान असतो. साहजिक त्यांचेही सतत मतभेद होत असतात. पण गुन्ह्याची उकल करत असताना जयचा तरुणाईशी असलेला कनेक्ट अनेकदा कामी येतो.

कथेतील हत्येच्या घटनेच्या निमित्ताने मुलांचे समाजमाध्यमावरील खासगी अकाउंट्स, त्यांचे पालकांसाठी अनाकलनीय असलेले भावविश्व, डिजिटल जगातच जगणाऱ्या या मुलांच्या आयुष्यातले ताणतणाव हे विषय कोणतेही हातभर संवाद न फेकता प्रभावीपणे मांडले आहेत. पुरुषी अहंकाराचे वेगवेगळे पैलू संयुक्ता दासचा पती, सहकारी पोलीस, राजकारणी नेता यांच्या रूपाने दिसतात.एका यशस्वी क्राइम थ्रिलर वेबमालिकेसाठी हवे ते सर्व निकष या मालिकेने पाळलेले आहेत. अखेरच्या एपिसोडपर्यंत ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होते. खुन्यापर्यंत पोहोचणार म्हणता म्हणता दरवेळी ट्विस्ट येतो. पटकथा सरधोपटपणे पुढे जात नाही. पोलिसांना मिळणारे सुगावे, त्यानंतर ते कसे मिळाले ते सांगणारे फ्लॅशबॅक याचा उत्तम मेळ जमविण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अंदाज बांधण्याचा वेळ मिळत नाही. घटनाही पटपट घडत जातात. एपिसोड मुद्दाम लांबवलेले नाहीत. गुन्ह्याचा तपास उगीच खूप वेगाने पुढे सरकताना दिसत नाही. त्यामुळे तो रिॲलिस्टिक वाटतो. राजकारणाचा एक वेगळा पोत यात आहे.

मालिकेची मध्यवर्ती भूमिका जगणारी संयुक्ता दास या पात्राला कोंकणा सेन शर्माने पुरेपूर न्याय दिला आहे. नैनाच्या आईची भूमिका अभिनेत्री इरावती हर्षे आणि वडिलांची भूमिका अभिनेता सागर देशमुख यांनी चोख निभावली आहे. हे दोनच मराठी कलाकार मराठी दिसतात. नैनातही कुठेही मराठीपण नाही. तसे तरुण नेता तुषार सुर्वे (शिव पंडित), त्याची सहकारी रक्षा पाटील (श्रद्धा दास) दिसत नाहीत. ते अमराठीच वाटतात कारण त्यांचा एखादा संवादही मराठीत नाही. आणखी एक सतत खटकणारी गोष्ट म्हणजे मालिकेत एक इन्स्पेक्टर शिंदे नावाचं पात्र आहे. ते फार दिसत नसलं तरी उल्लेख अनेक वेळा येतो. पण त्या नावाचा उल्लेख कोंकणा आणि जय कंवल हे दोघे ‘इन्स्पेक्टर शिंडे’ असा करतात. दुसऱ्या सीझनमध्ये यात बदल करण्यास दिग्दर्शकाला वाव आहे.

‘क्रिमिनल जस्टीस’, ‘मिथ्या’ यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शन केलेल्या रोहन सिप्पी यांनी तसाच बाज या मालिकेतही कायम ठेवला आहे. ‘क्रिमिनल जस्टीस’ला दर आठवड्याला प्रेक्षकांचा जीव टांगणीला ठेवणाऱ्या सिप्पी यांनी याही मालिकेचा शेवटासाठी आणखी एका सीजनचा घाट घातला आहे. पण ज्यांना थरारक, मर्डर मिस्ट्री प्रकारच्या मालिका आवडतात त्यांच्यासाठी सर्च-ः द नैना मर्डर केस ही एक उत्तम मेजवानी आहे.

सर्च : द नैना मर्डर केस

दिग्दर्शक : रोहन सिप्पी

ओटीटी : जिओ हॉटस्टार