नवी मुंबईतील दगडखाणी बंद असल्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे अडवणाऱ्या कंत्राटदारांना महापालिकेकडून खडी दिली जाणार आहे. या खडीचा खर्च कंत्राटदारांकडून वसूल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे रस्ते व नालेसफाईची कामे पावसाळ्याआधी पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना मंगळवारी व गुरुवारी कार्यक्षेत्रावर जाऊन पाहणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

खडीचा तुटवडा झाल्याने शहरात हाती घेण्यात आलेली रस्त्यांची बहुतांश कामे थांबली आहेत. कंत्राटदार खडीचे कारण देऊन कामे थांबवत असल्यास संबंधित कंत्राटदाराच्या खर्च व जबाबदारीवर रस्ते विभागाने खडी उपलब्ध करून द्यावी व त्याचा खर्च कंत्राटदाराकडून वसूल करावा, असे आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे झालेल्या मासिक बैठकीत ठरले. त्याचप्रमाणे प्रकल्प रस्त्यांतर्गत हाती घेण्यात आलेल्या ५५८ रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी रस्ते विभागप्रमुखांची तर खड्डे पडू नयेत यासाठी हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांच्या पृष्ठभागाचे काम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांची असल्याचेही या वेळी आयुक्तांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांकडून पाहणी

येत्या मंगळवारी व गुरुवारी कोणत्याही कार्यालयीन बैठका घेण्याऐवजी सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी रस्ते व नाल्यांच्या कामांची पाहणी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच या वेळीही पावसाळ्यात ३१३ ठिकाणी पाणीउपसा करणारे पंप बसवण्यात येतील.

गझधरबंद उदंचन केंद्र पूर्ण करण्याच्या सूचना

विलेपार्ले ते वांद्रे येथील सखल परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गझधरबंद येथे जलउदंचन केंद्राचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. हे केंद्र जूनमध्ये कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. मात्र सध्या या केंद्राचे काम अत्यंत धिम्या पद्धतीने चालले असल्याने हे काम पावसाळ्याआधी वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त मेहता यांनी अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक लक्ष्मण व्हटकर यांना केल्या.