झारखंड येथील माओवादी कारवायांमध्ये सक्रिय असलेला आणि गेल्या जानेवारीमध्ये ‘सीआरपीएफ’ जवानांच्या हत्याकांडातील नक्षलवादी पिंटू जवाहर पासवान (२३) याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी रात्री मुलुंड परिसरातून अटक केली. झारखंड पोलिसांसोबतच्या संयुक्त कारवाईत मुंबई पोलिसांनी पासवानला अटक केली. दरम्यान, त्याला झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.  
गेल्या महिन्याभरापासून पासवान मुलुंड परिसरात लपून बसला होता. कुणाला त्याच्याविषयी संशय येऊ नये वा त्याची खरी ओळख पटू नये यासाठी तो या परिसरात इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी कामगार म्हणून काम करीत होता. नक्षलवादी मुंबईत दाखल झाल्याबाबतची खात्रीलायक माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुप्तचर विभागाला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. झारखंड पोलिसांशी त्याबाबत शहानिशा केल्यानंतर तो पासवान असल्याचे पक्के झाले. त्यानंतर त्यांनी त्याच्या अटकेच्या कारवाईसाठी झारखंड पोलिसांनी मुंबईत येण्यास सांगितले. शुक्रवारी रात्री गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अजय सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने झारखंड पोलिसांसह संयुक्त कारवाई करीत पासवानला मुलुंड चेकनाका परिसरातून अटक केली.
उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या तावडीत सापडू नये या उद्देशाने पासवान मुंबईत दाखल झाला आणि कुणाला संशय येऊ नये म्हणून बांधकामाच्या ठिकाणी सुतार म्हणून काम करू लागला. पासवान हा गयाचा रहिवासी असून पारस गांजू दालम या नक्षलवादी संघटनेचा मुख्य सदस्य आहे.
१ ऑक्टोबर २००८ रोजी झारखंडच्या सत्वयनी गावातील उत्कर्मिक मध्यवर्ती विद्यालयावर मध्यरात्री बॉम्ब फेकण्यात आला होता. नक्षलवादी कारवायांचा छडा लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या पथकाने या शाळेचा आधार घेतला आहे आणि तेथेच तळ ठोकून असल्याचा संशय आल्यानंतर मध्यरात्री शाळेवर बॉम्ब फेकण्यात आला होता. पासवान या वेळी पोलिसांच्या तावडीतून निसटला. पासवाननेच शाळेत बॉम्ब ठेवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
संघटनेत नव्याने दाखल झालेल्या नक्षलवाद्यांना बॉम्ब बनविण्याचे आणि सुरुंग पेरण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पासवानकडे होती. त्याने स्वत: संघटनेचा वरिष्ठ नक्षलवादी सदस्य दालम याच्याकडून याचे प्रशिक्षण घेतले होते. माओ दालमचा म्होरक्या संदीप याने झारखंड येथे ७ जानेवारी रोजी ‘सीआरपीएफ’च्या जवानांवर हल्ला केला. पासवान हा संदीपचा खास मित्र असल्यानेच त्याचाही या हत्याकांडात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.