गेल्या काही दिवसांपासून एसी लोकलचा मुद्दा मुंबईच्या उपनगरांमध्ये पेटू लागला आहे. साध्या लोकल रद्द करून त्याऐवजी एसी लोकल सुरू केल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा सामना रेल्वे प्रशासनाला करावा लागत आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले होते. गर्दीच्या काळात एसी गाड्या चालवणे आम्हाला मान्य नसून या एसी लोकल रद्द करण्याची मागणी आव्हाडांनी केली आहे. प्रवाशांकडूनही या मागणीला पाठिंबा देण्यात आला होता. तसेच ही मागणी मान्य झाली नाही, तर रेल रोको करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आव्हाडांचा रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
भविष्यात प्रत्येक रेल्वे स्टेशनवर हजारोंच्या संख्येने हे आंदोलन छेडले जाईल आणि त्याला कोणी अडवू शकणार नाही असा इशारा देखील आव्हाडांनी रेल्वे प्रशासनाला देण्यात आला. गर्दीच्या वेळी एसी लोकल असताच कामा नये असे रेल्वे प्रवाशांचे एकमत आहे. साध्या लोकल बाजूला काढून त्यांच्या जागी एसी लोकल चालवणे सर्वसामान्य प्रवाश्यांना मान्य नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या एसी लोकल बंद केल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, आणि हे आंदोलन रेल्वे प्रशासनाला महागात पडेल असेही आव्हाड म्हणाले.
एसी लोकल ट्रॅकवर धावली तर ४ हजार लोक रेल्वेच्या बाहेर राहतील
“पारसिक सारखा ऐतिहासिक बोगद्यातून मेल आणि एक्सप्रेस गाड्या जात होत्या. मात्र, या गाड्या अचानक स्लो ट्रॅकवर आणल्या. खरा घोटाळा तिथेच झाला आहे. आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की, अमूक डेसिबलच्यावर रात्री दहानंतर आवाज असता कामा नये. एसी लोकल ट्रॅकवर धावली तर ४ हजार लोक रेल्वेच्या बाहेर राहतील. ती ४ हजार लोक जर ट्रॅकवर उतरली तर हे आंदोलन कोणालाही थांबवता येणार नाही”, असं म्हणत आव्हाडांनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे.
हेही वाचा- “शिवसेना आग आहे, नादी लागू नका, अन्यथा तुमची…”; दसरा मेळाव्यावरुन भास्कर जाधवांचा शिंदे गटाला इशारा
आंदोलन सर्वसामान्य प्रवाशांसाठी
“अंबरनाथची जी लोकल होती त्यातून मी दहा वर्ष प्रवास केला आहे. सीएसएमटी मला राजकारणमध्ये आणायचं नाही मी पक्ष विनिमय बाजूला ठेवून काही काम करतो. हे आंदोलन गरिबांसाठी आंदोलन आहे. या आंदोलनात सर्वसामान्य रेल्वे प्रवासी आहेत. ते मत कोणाला देतात? ते कोणत्या पक्षाचे आहेत? याच्याशी मला काही घेणं देणं नाही. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला की मी खुश होतो. प्रत्येक गोष्ट मतदानासाठी आणि पक्षासाठी करावी ही भूमिका माझी कधीच नाही”, असे आव्हाड म्हणाले.
नेमकं प्रकरण काय आहे?
काही दिवसांपूर्वी ठाणे-कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आक्रमक होत आंदोलन केलं. साध्या लोकल रद्द करून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्यामुळे हे प्रवासी आक्रमक झाले होते. या प्रवाशांनी कळवा कारशेडमधून सुटणारी एसी लोकल अडवून ठेवली. आधी यावेळी सुटणारी ही लोकल साधी होती. यातून हे प्रवासी प्रवास करत होते. आता तीच एसी लोकल झाल्यामुळे प्रवाशांची अडचण झाली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी जवळपास तासभर ही लोकल थांबवून ठेवली होती. मंगळवारी देखील बदलापूर रेल्वे स्थानकात अशाच प्रकारे आंदोलन करण्यात आलं होतं.