मुंबई- पुणे आणि ठाणे-पुणे या मार्गावरील ‘शिवनेरी’चा गारेगार प्रवास एसटी महामंडळासाठी फायद्याचा ठरत असल्याने आता एसटीच्या ताफ्यात ६० नव्या वातानुकूलित बसगाडय़ा येणार आहेत. या ६० पैकी २५ गाडय़ा एसटी विकत घेणार असून ३५ गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. या गाडय़ा व्होल्वो कंपनीच्या नसल्या, तरी त्या व्होल्वोसारख्याच आरामदायक असतील. या गाडय़ा सध्याच्या ठाणे-पुणे आणि मुंबई-पुणे याच मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तसेच बोरीवली-शिर्डी या मार्गावरही प्रायोगिक तत्त्वावर एक वातानुकूलित सेवा सुरू करण्याचा विचार एसटी करत असल्याचे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले.
एसटीचे बहुतांश मार्ग तोटय़ात असले, तरी मुंबई-पुणे या दरम्यान चालणाऱ्या ‘शिवनेरी’ सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. ‘शिवनेरी’ सेवेतील सर्वच गाडय़ा व्होल्वो कंपनीच्या असून प्रवाशांसाठी अत्यंत आरामदायक आहेत. एसटीच्या ताफ्यात सध्या सुमारे १०५ व्होल्वो गाडय़ा आहेत. यापैकी ९० गाडय़ा एसटीने भाडेतत्त्वावर घेतल्या असून एसटीने विकत घेतलेल्या व्होल्वो गाडय़ांची संख्या १५ एवढीच आहे. या १०५ गाडय़ांपैकी २५ गाडय़ा सेवेतून हद्दपार करण्याच्या स्थितीत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते.
आता एसटी ६० नव्याकोऱ्या वातानुकूलित गाडय़ा आपल्या ताफ्यात घेणार आहे. या गाडय़ा ताफ्यात आल्यावर सध्याच्या व्होल्वो गाडय़ांपैकी २१ गाडय़ा सेवेतून बाद केल्या जाणार आहेत. या ६० पैकी २५ गाडय़ा एसटी विकत घेणार असल्याचे खंदारे यांनी सांगितले. त्यासाठी अंदाजे २५ ते ३० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक अपेक्षित आहे. या नवीन गाडय़ा ताफ्यात आल्यानंतर एसटी वातानुकूलित सेवेसाठी काही अन्य मार्गाची चाचपणीही करणार असल्याचे खंदारे यांनी स्पष्ट केले. यात बोरीवली-शिर्डी या मार्गाबाबत विचार चालू आहे.
तोटय़ात असलेली एसटी २५ नव्या वातानुकूलित गाडय़ा विकत घेण्यासाठी सरकारकडून येणाऱ्या ५०० कोटी रुपयांच्या थकबाकीच्या रकमेवर अवलंबून आहे. मात्र ही रक्कम कामगार कराराची पूर्तता करण्यासाठी आवश्यक आहे. असे असतानाही या रकमेतील ३० कोटी रुपये खर्च करून नव्या गाडय़ा विकत घेण्याच्या निर्णयाबाबत मात्र कामगारांमध्ये असंतोष आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jul 2014 रोजी प्रकाशित
एसटीच्या ताफ्यात लवकरच ६० नव्या वातानुकूलित गाडय़ा
मुंबई- पुणे आणि ठाणे-पुणे या मार्गावरील ‘शिवनेरी’चा गारेगार प्रवास एसटी महामंडळासाठी फायद्याचा ठरत असल्याने आता एसटीच्या ताफ्यात ६० नव्या वातानुकूलित बसगाडय़ा येणार आहेत.

First published on: 21-07-2014 at 02:29 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New 60 ac bus to join st scod