गुलाबी थंडीत नववर्षांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेल्या मुंबईकरांना आता गारठय़ाऐवजी उष्मा सहन करावा लागणार आहे. पूर्व किनाऱ्यावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता असून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये जानेवारीच्या सुरुवातीला तापमानात आणखी घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र हे वर्ष अपवाद ठरत असून तापमान कमी होण्याऐवजी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सांताक्रूझ येथे १६.५ अंश से. किमान तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांनंतर या तापमानातही दोन ते तीन अंश से.ने वाढ होऊ शकते. त्यामुळे गुरुवारी पहाटे नववर्षांच्या स्वागताला किमान तापमान चढेच राहील.
आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यांच्या किनारी गेले दोन दिवस कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या क्षेत्राचा प्रभाव वाढला असून वाऱ्यांची दिशा पूर्व व आग्नेयकडून असल्याने पुढील तीन ते चार दिवसांत राज्यातील वातावरण ढगाळ होईल. मध्य महाराष्ट्रातील एकूण स्थितीचा अंदाज घेता दोन ते चार जानेवारी दरम्यान या भागात पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. डिसेंबर व जानेवारी या थंडीच्या मोसमात पाऊस पडण्याची शक्यता दुर्मिळ नाही. मात्र २०१४ च्या जानेवारीपासून संपूर्ण वर्षभरात अवकाळी पावसाने व गारपिटीने मध्य महाराष्ट्राला झोडपले आहे. देशाचा उत्तर भाग थंडीने काकडला असला तरी सध्या रात्रीच्या सुमारास वाऱ्याची दिशा पूर्व तसेच आग्नेयकडून आहे. त्यामुळे उत्तरेतील थंडीऐवजी पूर्व किनाऱ्यावरील तुलनेने दमट हवा राज्यात पोहोचत आहे. दिवसा मात्र वाऱ्यांची दिशा उत्तर व ईशान्येकडून असल्याने कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या घरात आहे.

पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी गारठून गेलेल्या राज्याच्या अंतर्गत भागाला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा व कदाचित गारपीटीचाही सामना करावा लागणार आहे. पूर्व किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रात २ ते ४ जानेवारी दरम्यान पाऊस पडणार असून ढगाळ वातावरणामुळे राज्यभरातील तापमान सुमारे दोन अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्यांच्या किनारपट्टीवर गेले दोन दिवस कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या क्षेत्राचा प्रभाव वाढला असून वाऱ्यांची दिशा पूर्व व आग्नेयकडून असल्याने पुढील तीन ते चार दिवसांत राज्यातील वातावरण ढगाळ होईल.