वैद्यकीय क्षेत्राच्या विस्तारलेल्या कक्षा, दररोज विकसित होणारे वैद्यकीय तंत्रज्ञान आणि रुग्णसेवेची सांगड घालून ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला अभ्यासक्रम, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय)च्या निवडणुका पूर्ण होऊ न शकल्यामुळे रखडल्याची शोकांतिका उघडकीस आली आहे. महाराष्ट्रात काहीजण या निवडणुकांसंदर्भात न्यायालयात गेल्यामुळे एमसीआयच्या काही निवडणुका अद्याप होऊ न शकल्याने २०१२ साली तयार करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम अजूनही बासनातच पडून आहे.
‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसचा अभ्यासक्रम कसा असावा याची माहिती वेगवेगळ्या पातळ्यांवर गोळा केली. त्यानंतर तज्ज्ञांकडून त्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला. अंतिम अभ्यासक्रम तयार करण्यासाठी शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, डॉ. कौल, डॉ. कृष्णा शेट्टी, तसेच एमसीआयच्या डॉ. राजलक्ष्मी यांच्या आधिपत्याखाली एका समितीची स्थापना केली. या समितीने फाऊंडेशन कोर्ससह, कौशल्य विकास, रुग्णोपचाराचा पहिल्या वर्षांपासून अनुभव मिळावा, तसेच जगभरातील वेगाने वाढणारे वैद्यकीय ज्ञान याचा विचार करून सर्वसमावेशक अभ्यासक्रम तयार केला. या अभ्यासक्रमात पहिले वर्ष हे मे महिन्यात संपण्याऐवजी सप्टेंबपर्यंत चालेल, तसेच दुसऱ्या वर्षांचा कालावधी १४ महिन्यांचा असेल असे निश्चित केले. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षीच एकूण अभ्यासाची रूपरेषा, सामाजिक जाणीव, शरीरशास्त्राप्रमाणेच रुग्णांची मानसिकता आणि रुग्णोपचाराचा प्रत्यक्ष अनुभव यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करायला मिळणार आहे. सध्या पहिल्या दोन वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना थेट रुग्णोपचार करायला अथवा पाहण्यास वाव नाही. नवीन अभ्यासक्रमात पहिल्याच वर्षी रुग्णोपचाराची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या अभ्यासक्रमाला एमसीआयच्या बोर्ड ऑफ स्टडिज व अ‍ॅकॅडमिक कौन्सिलने मान्यता दिली असून केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयानेही तो स्वीकारला आहे. दुर्दैवाने एमसीआयची निवडणूक लांबल्यामुळे हा अभ्यासक्रम गेली दोन वर्षे लागू होऊ शकलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीतील राजकारण वेगळ्याच वळणावर जात असल्याने कोर्टकचेऱ्यांमध्येही वेळ वाया जातो. त्यामुळेच तज्ज्ञांनी वेळेत अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी पार पाडूनही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.