‘‘गिर्यारोहण या साहसी खेळावर सरकारी नियंत्रणाची गरज नसून त्या खेळाच्या शिखर संघटनेने केलेल्या नियमांचा आधार असायला हवा,’’ असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ स्कॉटिश गिर्यारोहक मार्टिन मोरान यांनी ‘वृत्तान्त्त’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले. सरकारी हस्तक्षेप आला की लाल फितीचा कारभार सुरू होतो आणि खेळ दुर्लक्षित होतो, त्यापेक्षा खेळाचे स्वत:चे नियम आणि स्वयंनियंत्रण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात साहसी खेळांना सरकारी पिंजऱ्यात बंदिस्त करायला निघालेल्या सरकारी भूमिकेच्या पाश्र्वभूमीवर आल्प्स पर्वतराजीतील ज्येष्ठ गिर्यारोहकाच्या या विधानाचे महत्त्व उठून दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्या आल्प्सच्या पर्वतराजीत गिर्यारोहण या साहसी खेळाची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या आल्प्सच्या पायथ्याहून आलेल्या मार्टिन मोरान यांनी गिर्यारोहण या साहसी खेळाची युरोपातील संघटनात्मक रचना या वेळी उलगडून सांगितली. ते सांगतात की, इंग्लंडमध्ये ‘ब्रिटिश माऊंटेनिअरिंग कौन्सिल’ने गिर्यारोहणाच्या नियमनासाठी अभ्यासक्रम, मार्गदर्शक तत्त्वे, नियम तयार केले आहेत. एखादा अपघात झाला किंवा काही वादग्रस्त मुद्दा असेल तर चौकशी समिती त्याचा आधार घेते. न्यायालयीन प्रकरणांतदेखील या नियमांचा आधार घेतला जातो. सुरक्षेचे हे नियम स्वयंसेवी तसेच व्यापारी तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या सर्वानाच लागू असतात. व्यापारी तत्त्वावरील संस्थांच्या शिखर संघटनेला तर चुकांबद्दल सभासद संस्थेचा परवाना रद्द करण्याचे देखील अधिकार आहेत. या सर्व प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप नसतो. उलट स्वयंसेवी संस्थांना खेळाचा विकास व्हावा म्हणून मोठय़ा प्रमाणात सरकारी मदत आणि प्रोत्साहन मिळत असते. भारतात नेमकी सध्या या रचनेची उणीव असल्याचे यानिमित्ताने ठळकपणे दिसून येते.  नियमावली आणि अनुभव असला तरी गिर्यारोहणात होणाऱ्या अपघातांबद्दल विचारले असता, ९० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळेच होत असल्याचे ते सांगतात. त्यामुळेच या खेळाला स्वयंनियंत्रणाचीच गरज असणे महत्त्वाचे असल्याचे त्याचे ठाम मत आहे. हल्ली व्यापारी तत्त्वावरील गिर्यारोहणांमध्ये शिखर सर करवून देणे बांधील असते, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढताना दिसते. तर प्रायोजित मोहिमांमध्ये प्रायोजकाचे दडपण गिर्यारोहकावर येत असते. त्याचबरोबर विक्रम करण्याची हावदेखील अनेक अपघातांना कारणीभूत ठरत असल्याकडे ते लक्ष वेधतात. हिमालयन क्लबच्या ८८ व्या वार्षिक कार्यक्रमासाठी मार्टिन हे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. मार्टिन हे नंदाकोट शिखरावर दक्षिण धारेने व नीळकंठ शिखरावर पश्चिम धारेने आरोहण करणाऱ्या पहिल्या यशस्वी आरोहकांपैकी एक असून त्यांनी हिमालयातील २५ शिखरं सर केली आहेत. तर आल्प्स पर्वतराजीचा ट्रॅव्हर्स एकाच हिवाळ्यात सलगपणे पूर्ण करताना चार हजार मीटर्स उंचीच्या ७५ शिखरांवर ५२ दिवसात यशस्वी आरोहण केले आहे. त्यांचा हा विक्रम आजही अबाधित आहे. १९८५मध्ये त्यांनी उत्तर स्कॉटलंडमध्ये माउंटन स्कूलची स्थापना केली आहे. हिमालयन क्लबचा वार्षिक कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते.

हिमालयात माहितीची कमतरता हीच खरी अडचण – मार्टिन मोरान

‘‘भारतीय हिमालयात गिर्यारोहकांना आव्हानात्मक अशी अनेक हिमशिखरं आहेत, पण अनेक ठिकाणी कंटूर मॅप, संपर्कमाध्यमं अशा मूलभूत सुविधांचीदेखील वानवा आहे. त्यामुळेदेखील अपघातांना तोंड द्यावे लागते. हिमालयात व्यापारी तत्त्वावर चालणाऱ्या मोहिमा या केवळ वलयांकित शिखरांभोवतीच चालतात, तेथे अशा सर्व सुविधा असतात. पण तेच जर दुर्लक्षित शिखरावर जायचे असेल तर भारतातील गिर्यारोहणात माहितीची कमतरता ही मोठी अडचण आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No government interference in climbing