‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध; यंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय?

अर्थसंकल्पावर विविध घटकांचे आशा-अपेक्षांचे ओझे आहे. सूट, सवलती, करमाफी, तरतुदीत वाढीच्या मागण्याही विविध कोनांतून सुरू आहेत.

यंदा कठोर उपाययोजना की लोकानुनय?

मुंबई : तिसऱ्या लाटेचे संकट थोपवून अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येत असल्याचे दिसत असले तरी तिला अपेक्षित गती पकडता येईल काय, याची तड अवघ्या काही दिवसांवर आलेल्या २०२२-२३ सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून लागेल. सरकारच्या तिजोरीतील उत्पन्नवाढीसाठी पूरक ठरतील इतकी सुदृढता पायाभूत घटकांनी मिळविली नसताना, जमा-खर्चाची तोंडजुळवणी अर्थसंकल्पात कशी केली जाईल, याचा वेध शुक्रवारी, २८ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून घेतला जाणार आहे.

अर्थसंकल्पापूर्वी होत असलेल्या या विश्लेषणातून, प्रसिद्ध अर्थविश्लेषक मंगेश सोमण आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापुढे असणारी आव्हाने जोखून, संभाव्य तरतुदी आणि घोषणांचा पट वाचकांपुढे खुला करतील. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रायोजक असलेला हा ‘लोकसत्ता-विश्लेषण’ कार्यक्रम दूरचित्रसंवाद माध्यमातून होत आहे. वाचकांनाही त्यांचे शंका-प्रश्न विचारून या मंथनात सहभागी होता येईल.

यंदाच्या अर्थसंकल्पावर विविध घटकांचे आशा-अपेक्षांचे ओझे आहे. सूट, सवलती, करमाफी, तरतुदीत वाढीच्या मागण्याही विविध कोनांतून सुरू आहेत. तरी हा संकल्प पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पाहता, मतपेटीला लक्ष्य करणारा अल्पदृष्टीचा की दीर्घोद्देशी कठोर निग्रहाचा याचाही कस लागेल.

लसीकरणाच्या आघाडीवर देशाची दमदार कामगिरी राहिली. साथीच्या संकटाच्या मुकाबल्यासाठी सरकारकडून खर्च वारेमाप केला गेल्याचा सरकारचा दावा आहे. अर्थात वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) वाढलेल्या महसुलाची चांगली साथही सरकारी तिजोरीला मिळाली.

यंदा भरघोस पिकाचा दिलासा अर्थव्यवस्थेला मिळण्याचाही अंदाज आहे. मात्र करोना निर्बंध हटविण्याच्या कासवगतीने अर्थव्यवस्थेचा निम्मा हिस्सा व्यापणाऱ्या सेवा क्षेत्राची कुंठितावस्था, राज्यांचा डळमळलेला वित्तीय डोलारा, परिणामी सर्वदूर बेरोजगारी आणि भरीला महागाईचा आगडोंब अशी गंभीर आव्हाने अर्थमंत्र्यांपुढे असतील.  एअर इंडियाचा अपवाद केल्यास निर्गुंतवणूक आणि खासगीकरणाच्या आघाडीवर अपेक्षित यश न मिळाल्याने करोत्तर महसुलाची बाजूही लंगडी पडलेली असेल. यामुळे करोनाकाळाचा फटका बसलेल्या नोकरदारांना कोणता कर-नजराणा अर्थमंत्री देतील, याकडेही सर्वांचेच डोळे लागले आहेत.

अर्थसंकल्प-

पूर्व विश्लेषण

कधी? : शुक्रवार, २८ जानेवारी २०२२

वेळ : सायंकाळी ६ वाजता

’ प्रायोजक : लोकमान्य मल्टिपर्पज

को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

सहभाग कसा?

दूरचित्रसंवाद माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमात सहभागासाठी  http:// tiny. cc/ LS_ BudgetVishleshan_2022 येथे नोंदणी आवश्यक.

वक्ते :  ’ मंगेश सोमण,  प्रसिद्ध अर्थविश्लेषक ’ गिरीश कुबेर, संपादक, लोकसत्ता 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Observing the budget through loksatta analysis program akp 94

Next Story
सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे; पहिल्या पाचात भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याला स्थान नाही
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी