दिवाळीच्या तोंडावर फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स व्यावसायिकांनी विविध ऑफर्समधून ऑनलाइन खरेदीचा बाजार तापविला असतानाच आता ऑफलाइन म्हणजे किरकोळ व्यवसायानेही ई-कॉमर्सची कास धरू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ई-कॉमर्समंचापेक्षा भिन्न असलेल्या या पारंपरिक किरकोळ व्यवसायालाही ‘ई भुरळ’ पडली आहे. स्पर्धेच्या जगात नाविन्यतेची कास धरण्याचा प्रयत्न हेही क्षेत्र करत आहे. दालने सुसज्ज करण्याबरोबरच विक्री, माल हाताळणी, प्रसार – प्रचार मोहीम याकरिता या व्यावसायिकांनी माहिती तंत्रज्ञानाची जोड असलेली उपकरणे, यंत्रणा अंगिकारली आहे. बिग  बझारसारखी सर्वोच्च दालन साखळी चालविणाऱ्या फ्युचर समूहाने ‘फ्युचर पे’ हे स्वत:चे वेतनदेयक असलेले वॉलेट सादर केले आहे. फ्युचरच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे समूहाच्या विविध दालनातील खरेदी याद्वारे सुलभरित्या होते. तर टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसने खास लघू व मध्यम उद्योजकांकरिता एमडीएम ही केवळ मोबाईल, लॅपटॉप, टॅबद्वारे सारा व्यवसाय हाताळला जाईल, अशी मोबाईलवर चालणारी सुविधा बाजारात आणली आहे. छोटय़ा दुकानदारांना त्यांच्या जाहिराती, त्यांच्याकडे असलेल्या सूट-सवलतींचा प्रसार याकरिता टाटा समूहाद्वारेच मोठा टीव्ही, पडदे यापूर्वीच उपलब्ध करून देणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

दसऱ्याला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाच्या जोरावर यंदा विक्रेते, ऑफलाईन रिटेल व्यावसायिक दिवाळीसाठीही सज्ज झाले आहेत. दालन सजावट, अधिक उत्पादने, अधिक सवलती याचबरोबर माहिती तंत्रज्ञानावर अधिक सुलभ व जलद वस्तू विक्री तसेच पुरवठा यंत्रणा भक्कम करण्यावर त्यांचा भर आहे. त्यासाठी विविध माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवठादारांशी त्यांचे व्यावसायिक सहकार्य वेगाने घडत आहेत.

ई-कॉमर्सबरोबरच ऑफलाईन रिटेल व्यावसायिकांकडूनही वाढत्या ई-पेमेंट साधनांचा वापर वाढतो आहे. पेटीएमसारख्या सुलभ देयक मंचावर दिवाळीकरिता होणाऱ्या खरेदीकरिता महाबाजार सेलची घोषणा केली आहे. या एकाच मोठय़ा मंचावर १३ लाख व्यापाऱ्यांपैकी १०,००० हून अधिक व्यापारी यंदाच्या मोसमात, विशेषत: दिवाळीत १०० कोटींपेक्षा अधिक योगदान देतील, असा अंदाज आहे.

दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा खरेदीचा मोसम आहे आणि सध्या उपलब्ध असलेल्या खास सूट-सवलती यंदाच्या आनंदोत्सवात ग्राहकांच्या आनंदात भर घालतील, असा विश्वास आहे.

– सौरभ वशिष्ठ, पेटीएमचे उपाध्यक्ष.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Offline e commerce craze