मुंबई : न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास सुनावण्यात आल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर  शरण येण्याऐवजी ‘ऑर्बिट व्हेंचर्स’चे राजेन ध्रुव आणि हिरेन ध्रुव हे दोन व्यावसायिक फरार झाले. या दोघांना शोधून अटक करण्याचे आणि न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

न्यायमूर्ती के. आर. श्रीराम आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने संबंधित बँका आणि वित्तीय संस्थांना या दोन्ही व्यावसायिकांची खाती गोठवण्याचे, त्यांचे विविध मार्गाने केले जाणारे बँक व्यवहार थांबवण्याचे आदेशही दिले आहेत. दिलेल्या हमीचे पालन केले नाही म्हणून न्यायालयाने गुरुवारी या दोघांना अवमान प्रकरणी दोषी ठरवून त्यांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच दोघांनी शुक्रवारी न्यायालयासमोर अभ्यर्पण करावे, असे आदेश दिले होते. परंतु दोघेही न्यायालयासमोर हजर होण्याऐवजी फरारी झाले.

त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांना शोधून त्यांना अटक करावी व न्यायालयासमोर हजर करावे. हा आदेश म्हणजे दोन्ही व्यावसायिकांविरोधातील अजामीनपात्र वॉरंट असल्याचे समजून ही कारवाई करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. भारतातील सर्व विमानतळ प्राधिकरणे आणि इमिग्रेशन प्राधिकरणांना या दोघांविरुद्ध दिसता क्षणीच (लुकआउट नोटीस) ताब्यात घेण्याचे कळवण्यात यावे, असे आदेशही न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

प्रकरण काय ?

ऑर्बिट व्हेंचर डेव्हलपर्स आणि अ‍ॅक्सिस फायनान्स लिमिटेड यांच्यातील वादाप्रकरणी यापूर्वी देण्यात आलेल्या आदेशांचे पालन केले नाही म्हणून २३ मार्च रोजी उच्च न्यायालयाने राजेन ध्रुव आणि हिरेन ध्रुव या दोघांना अवमान कायद्यांतर्गत दोषी ठरवले होते. तसेच त्यांना सहा महिन्यांच्या  कारावासाची शिक्षा सुनावली होती. परंतु या दोघांनी ३१ मार्चपासून सहा हप्तय़ांमध्ये १०२ कोटी रुपयांची परतफेड करणार असल्याचे तसेच खार पश्चिम मधील स्वार्वोस्की अपार्टमेंट प्रकल्पातील सदनिका अन्य कोणाला विकल्या जाणार नाहीत, असे  हमीपत्र न्यायालयात सादर केले. त्यामुळे न्यायालयाने त्यांची शिक्षा स्थगित केली होती. परंतु त्यांनी  हमीचे पालन केले नाही.