साइट इंजिनीअरना अटक
मुंबई महापालिकेत झालेल्या ३२५ कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्यात सोमवारी रात्री पाच साइट इंजिनीअरना अटक होऊन १२ तासही उलटत नाही तोच मंगळवारी सकाळी मुंबई पोलिसांनी आणखी तीन साइट इंजिनीअरना अटक केली. महावीर रोड्स अँड इन्फ्रा, जे. कुमार-के.आर. कन्स्ट्रक्शन आणि के. आर. कन्स्ट्रक्शन्स या कंत्राटदारांकडे कामाला असलेल्या तीन इंजिनीअरना अटक करण्यात आली आहे. घोटाळ्यात अटक झालेल्यांची संख्या आता २२ झाली आहे.
महापालिकेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्य़ाचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) करण्यात येत आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत सहा कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर १० ऑडिटर आणि ९ सब-कॉन्ट्रॅक्टर आणि साइट इंजिनीअरना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी एसआयटीने महावीर रोड्स अँड इन्फ्रा कंत्राटदाराचे दत्तात्रय धस (२६ वर्षे) जे. कुमार-के.आर. कन्स्ट्रक्शनचे आशीष जैस्वाल (२७) आणि हृषीकेश शिंदे (२३) यांना अटक करण्यात आली आहे. रस्त्याचा दर्जा निकृष्ट असूनही त्याची तपासणी करण्यात आलेल्या ऑडिटरची दिशाभूल करून त्यांनी चुकीची माहिती पुरविल्याचा आरोप या तीनही साइट इंजिनीअरवर आहे. संपूर्ण घोटाळ्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता २२ झाली आहे.