अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास चुकीच्या दिशेने चालला असल्याचा आरोप शुक्रवारी सनातन संस्थेने केला. दाभोलकरांच्या हत्येला दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप आरोपींना पकडण्यात पुणे पोलिसांना यश न आल्याबद्दल सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनीच या हत्येप्रकरणातील आरोपींना दडवून ठेवले असल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि विद्या चव्हाण अशा पद्धतीने बोलत आहेत की जणू त्यांनीच आरोपींना दडवून ठेवले आहे, असे वर्तक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या ५० साधकांची चौकशी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी कोणतेही समन्स न बजावता गोव्यातून संदीप शिंदे या साधकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police failed to nab real culprits in dabholkar case sanstha