राज्यातील विजेच्या दरात सरासरी ८ टक्के दरवाढ मागणारा ४७१७ कोटी रुपयांचा वीज दरवाढ प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) दाखल केल्याने राज्यावर वीज दरवाढीचे संकट आहे. याचबरोबर आता उपनगरवासीयांनाही वीज दरवाढ सहन करावी लागणार आहे. मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या आरइन्फ्रा या कंपनीनेही सरासरी १० टक्के दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे.
महसुलात होणारी तूट भरून काढण्यासाठी दरवाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामध्ये वहन आकारात कोणतीही वाढ करण्यात येणार आहे. क्रॉस सबसिडीचे दर कमी करण्याचेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. तसेच कायमस्वरूपी दरांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल कंपनीने प्रस्तावात दाखविलेला नाही. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या काळातील वीज दरासाठीचा हा प्रस्ताव कंपनीने राज्य वीज नियामक आयोगात दाखल केला असून त्यावर १६ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. कंपनी रेल्वेला पुरवित असलेल्या सेवेतही प्रति युनिट १२ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक सेवेसाठी पुरविल्या जाणाऱ्या वीज दरात सात टक्क्यांनी वाढ केली आहे.