एकेकाळी प्रामुख्याने कामगारांची असलेल्या प्रभादेवी, वरळीला उच्चभ्रूंच्या वसाहतीसाठी ‘अप्पर’ असे संबोधून उत्तुंग टॉवर्ससाठी बिल्डरांनी ३० फूट नाल्याची रुंदी सरसकट आठ फूट केल्याचा फटका आता बसू लागला आहे. रुंद नाला अरुंद केल्यामुळे आता मुंबईतील मलनिस्सारणाचा गाळ एल्फिस्टन येथे तुंबत असून त्यामुळे प्रभादेवी, वरळीला महाप्रलयाचा धोका असल्याचे मत तज्ज्ञांना वाटत आहे. आपले पाप लपविण्यासाठी पालिका शेकडो ट्रक गाळ उपसून काढीत असल्याचे दिसून येत आहे.
प्रभादेवी-वरळी परिसरात पूर्वी ३० मीटर रुंद नाला होता, असे ‘कलेक्टिव्ह रिसर्च इनिशिएटिव्ह ट्रस्ट’ म्हणजेच क्रिटच्या १९३३ च्या नकाशात आढळून येते. या नकाशानुसार, वांद्रे येथून तुळशी पाईप रोड मार्गे एलफिस्टन रोड आणि तेथून नागू सयाजी रोड, आदर्शनगरजवळून लव्ह ग्रोव्ह पंपिंग स्टेशनपर्यंत ३० मीटर रुंद नाला होता. पूर्वी वांद्रे ते दहिसपर्यंतच नव्हे तर अगदी वरळीपर्यंत मिठी नदीचे वास्तव्य होते. परंतु वांद्रेपुढील मिठी नदीच्या मार्गातून मलनिस्सारण करण्यात येऊ लागल्याने त्याला नाल्याचे स्वरूप आले. हा नाला एलफिन्स्टन येथे अरुंद केल्यामुळे आता मोठय़ा प्रमाणात गाळ साचू लागला आहे. हा गाळ काढण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. आता दररोज हा गाळ जमा होणार असल्यामुळे पावसाळ्यात प्रभादेवी-वरळी परिसर जलमय होण्याची भीती या प्रकरणी सतर्क असलेले वास्तुरचनाकार मिलिंद गोरक्ष यांनी केला आहे. सतत पाठपुरावा करून या विषयावर ते लक्ष वेधत असले तरी पालिका अधिकारी मात्र हे मान्य करायला तयार नाहीत. महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे संचालक लक्ष्मण व्हटकर यांनी मात्र याचा इन्कार करीत रस्ते विभागामार्फत काम सुरू असल्याचा दावा केला. मात्र मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जोरात काम सुरू असते आणि शेकडो ट्रक आता महिनाभरात गाळ घेऊन गेल्याचे गोरक्ष यांनी ठामपणे सांगितले.
झोपडपट्टय़ांनी व्यापला नाला
३० मीटर रुंद नाला प्रचंड झोपडपट्टीमुळे आठ मीटरच उरला आहे. या नाल्याच्या अतिक्रमित झालेल्या एकूण ३७ हजार चौरस मीटर जमिनीवर झोपडपट्टी उभी राहिली आहे. नाल्यावरील झोपडय़ांना फोटो पास, सीटीएस क्रमांकही मिळाले आहेत.