एका तपानंतर लेखक, दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या गाजलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाशी नातं सांगणारा ‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांसमोर येणार आहे. नवीन प्रेमाची गोष्ट ही पहिल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे की एक वेगळीच प्रेमकथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे? या प्रश्नापासून ते गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांची अभिरुची कशी बदलत गेली आणि त्या अनुषंगाने चित्रपटकर्मी म्हणून स्वत:त कसे बदल घडत गेले, अशा विविध मुद्यांवर ‘प्रेमाची गोष्ट २’चे कलाकार ललित प्रभाकर, भाऊ कदम, नायिकांच्या भूमिकेत असलेल्या रिधिमा पंडित, रुचा वैद्या आणि खुद्द सतीश राजवाडे यांनी ‘लोकसत्ता’शी दिलखुलास गप्पा मारल्या.
आजच्या पिढीच्या प्रेमाची गोष्ट
‘या चित्रपटाचं नाव काय ठेवायचं, याबद्दल निर्मात्यांबरोबर खूप चर्चा सुरू होती, तरी माझ्या डोक्यात चित्रपटाचं नाव निश्चित ठरलेलं होतं. ‘मुंबई पुणे मुंबई’सारखी एकच कथा पुढे नेणारा सिक्वेलपट म्हणून ‘प्रेमाची गोष्ट २’कडे पाहता येणार नाही, मात्र ‘प्रेमाची गोष्ट’ ज्यांनी पाहिला आहे, त्यांना हा नवीन चित्रपट पाहिल्यानंतर निश्चितच दोघांमध्ये एक समान धागा आहे हे लक्षात येईल. त्यामुळे ही ‘प्रेमाची गोष्ट २’ आहे. दुसरं माझं प्रेमावर खूप प्रेम आहे. प्रेम आणि त्यातून निर्माण होणारे परस्पर नातेसंबंध यातच भरपूर नाट्य दडलेलं असतं. आणि ही आजच्या पिढीच्या प्रेमाची गोष्ट आहे. या पिढीचे विचार, त्यांचा वेग, त्यांचं राहणीमान आणि आपल्या आजूबाजूला जे घडतं आहे त्याचं प्रतिबिंब या चित्रपटात उमटलेलं आहे’, अशा शब्दांत दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी चित्रपटाच्या नावामागची गोष्ट उलगडली.
प्रेमपटाचा नायक म्हणून सबकुछ…
‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचा नायक म्हणून खूप काही करता आलं, असं ललितने सांगितलं. ‘या चित्रपटात मनोरंजनासाठी अपेक्षित मसाला पुरेपूर भरलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना आवडेल अशा नायकाची व्यक्तिरेखा साकारताना मला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं. माझ्या वाट्याला या चित्रपटातला व्हीएएक्सचा भागही अधिक प्रमाणात असल्याने समोर अमूक गोष्ट घडते आहे याची कल्पना करून संवाद म्हणणं, ते रंगतदार होण्यासाठी नजरेचा, देहबोलीचा विशिष्ट पद्धतीने उपयोग करून बोलणं हे अभ्यासून करता आलं. एका अभिनेत्याला जे जे काही करावंसं वाटतं ते सगळं करण्याची संधी मला ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटामुळे मिळाली आणि ते खूप महत्वाचं आहे’ असं त्याने सांगितलं.
दोन नायिकांची गोष्ट
हिंदीत दूरचित्रवाणीवरून घरोघरी पोहोचलेली मूळची मराठी असलेली अभिनेत्री रिधिमा पंडित आणि ‘पाणी’ या चित्रपटातून पदार्पण केलेली अभिनेत्री रुचा वैद्या या दोघी चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत आहेत. अभिनेत्री म्हणून पहिल्यांदाच चित्रपटात काम करणाऱ्या रिधिमाने सतीश राजवाडे यांच्यासारखा दिग्दर्शकाबरोबर पहिल्याच चित्रपटात काम करायला मिळाल्याने खूप शिकायला मिळालं जे मला वाटतं पुढेही माझ्या उपयोगी पडेल, असं सांगितलं. तर ‘पाणी’ मध्ये आदिनाथ कोठारे आणि ‘प्रेमाची गोष्ट २’ या दुसऱ्याच चित्रपटात ललितसारख्या अभिनेत्याबरोबर काम करताना कलाकार म्हणून मलाही काहीतरी चांगलं करून दाखवण्यासाठी वाव मिळाला, अशी भावना रुचाने व्यक्त केली.
सिनेमा तुम्हाला एकच संधी देतो…
‘सिनेमा हा तुम्हाला एकच संधी देतो. तुम्ही जे काही शोधलं आहे, तुम्हाला जे समजलं आहे, ज्याचा उपयोग करून तुम्ही पडद्यावर गोष्ट रंगवल्यानंतर ती आयुष्यभरासाठी तशीच राहणार आहे. दूरचित्रवाहिनीवर काम करताना तसं होत नाही. आज चित्रीकरणात एखादी चूक झाली, तर उद्या ती सुधारता येते. त्यामुळे तिथे तुम्ही दरदिवशी नवं काहीतरी शोधू शकता’ असा अनुभव राजवाडे यांनी सांगितला.
‘आरपार’मुळे नवीन प्रेक्षकवर्ग
‘आरपार’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता आणि निर्माता अशा दुहेरी भूमिकेत लोकांसमोर आलेल्या ललितने या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांकडे सहसा न वळणारा तरुण प्रेक्षकवर्ग नव्याने जोडला गेल्याचं सांगितलं. आता या नव्या प्रेक्षकवर्गासह सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी सतत नवीन दर्जेदार आशय देत प्रेक्षकसंख्या वृद्धिंगत करणं महत्त्वाचं आहे, असंही तो म्हणाला.
काळ तुम्हाला मागे सोडेल…
‘कलाकार म्हणून तुम्ही तुमच्या कामातून लोकांचा जो विश्वास मिळवला आहे तो पुढे जातानाही टिकवून ठेवणं ही जबाबदारी असते’ असं ललित म्हणतो. ‘माझ्यापेक्षा ३५ वर्षांचा दीर्घ अनुभव सतीश राजवाडे यांच्याकडे आहे. त्यांनी जो त्यांचा प्रेक्षकवर्ग इतक्या वर्षात निर्माण केला तो एकाच पद्धतीचे चित्रपट करून कमावलेला नाही, भाराभर चित्रपट करण्यापेक्षा त्यांना जे आवडेल, ज्या विषयाबद्दल विश्वास वाटेल, तेच चित्रपट त्यांनी केले. त्यांनी वेळोवेळी स्वत:त सुधारणा केल्या. त्यामुळे काळाबरोबर तुम्ही बदलणं गरजेचं आहे नाहीतर काळ तुम्हाला मागे सोडेल’, असं निरीक्षण ललितने नोंदवलं.
‘मी स्वत:ला गृहित धरणार नाही. माझी भाषा, शरीरयष्टी, नृत्यकौशल्य… कलाकार म्हणून माझ्या प्रगतीसाठी जे जे कमी पडतं आहे ते मी करणार. माझ्या प्रत्येक चित्रपटागणिक प्रेक्षकांना वाटेल की नाही आत्ताचा ललित काहीतरी वेगळा आहे, तर तो बदल त्यांना देत राहावंसं मला वाटतं’, असंही ललितने सांगितलं.
छोटे छोटे बदल करत राहिलं पाहिजे
‘कलाकार, तंत्रज्ञ, लेखक म्हणून तुम्हाला सतत बदलत राहावंच लागतं. दर काही वर्षांनी प्रेक्षक बदलतात आणि त्यांना गृहित धरणं चुकीचं आहे. कथाकार म्हणून स्वत:ला विकसित करत राहिलंच पाहिजे, नाहीतर आपणही तिथेच अडकून पडतो. त्यामुळे लेखक – दिग्दर्शक या नात्याने मीसुध्दा एकाच बाजाचे चित्रपट केले नाहीत. ‘एक डाव धोबीपछाड’ किंवा ‘मुंबई पुणे मुंबई’ यशस्वी झाला म्हणून तसेच चित्रपट जाणीवपूर्वक केले नाहीत. आत्ताही प्रेमाची गोष्ट सांगताना मी व्हीएफएक्स तंत्राच्या मदतीने पुढे जाणारी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. करोनानंतर तर डिजिटल आशय पाहण्याची सवय असलेल्या प्रेक्षकांना तुम्ही सातत्याने छोटं छोटं का होईना वेगळं देत राहिलात तर ते नक्की तुमचा चित्रपट पाहायला येणारच’, असा विश्वास सतीश राजवाडे यांनी व्यक्त केला.
‘मनोज वाजपेयी यांची भीती वाटायची’
‘चला हवा येऊ द्या’मधून बाहेर पडल्यानंतर अभिनेते भाऊ कदम हिंदीत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘इन्स्पेक्टर झेंडे’ चित्रपटातून लोकांसमोर आले. आता ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटातही त्यांनी वेगळी भूमिका साकारली आहे. ‘इन्स्पेक्टर झेंडे’ प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेते मनोज वाजपेयी यांनी त्यांचं कौतुक केलं, त्या अनुभवाबद्दल सांगताना भाऊंनी सुरूवातीला मनोज वाजपेयी यांच्या बाजूला बसायचीही भीती वाटायची, असं सांगितलं. ‘मी त्यांचं काम बघत असायचो. ते माझ्याकडे पाहात असायचे. ये कुछ अलग करता है… असं ते म्हणायला लागले आणि नंतर मला लक्षात आलं की ते माझ्या कामाचं निरीक्षण करत होते’, अशी आठवण सांगताना दडपण आणि आनंद एकाचवेळी अनुभवल्याचं त्यांनी सांगितलं.