मुंबईच्या उपनगरीय प्रवासादरम्यान महिलांच्या डब्यांत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. या घोषणेची अंमलबजावणी लवकरच मुंबईतील उपनगरीय गाडय़ांमध्ये होणार आहे. त्यासाठी रिलायन्स मुंबई मेट्रोवनच्या अधिकाऱ्यांशी आपली बैठक झाली असून मेट्रोच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही प्रणाली कशी चालवली जाते, याचाही अभ्यास करण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पातही झाली होती. त्यानुसार मध्य रेल्वेने आपल्या कामासाठीच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून चाचण्याही घेतल्या होत्या. या चाचण्या यशस्वी झाल्याचे ब्रिगेडिअर सूद यांनी सांगितले. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबतच रिलायन्स मेट्रोवनच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.
मेट्रोच्या प्रत्येक डब्यात तीन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र हे कॅमेरे ३६० अंशांमध्ये फिरत असल्याने ते डब्यातील सर्व गोष्टी टिपू शकतात. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण मेट्रोच्या चालकाकडे तसेच मेट्रोच्या नियंत्रण कक्षातही असते. त्यामुळे मेट्रो सुरू झाल्यापासून महिलांच्या छेडछाडीचा एकही प्रकार घडलेला नाही. नेमकी हीच गोष्ट आम्हाला रेल्वेतही अपेक्षित असल्याचे ब्रिगेडिअर सूद म्हणाले. या कॅमेऱ्यांमुळे महिलांच्या एकांतात बाधा येणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
सीसीटीव्ही कॅमेरे हे आयपी बेस्ड् आणि गाडीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत केबलने जोडलेले अशा दोन प्रकारांत येतात. आयपी बेस्ड् कॅमेऱ्यांचा खर्च एका कॅमेऱ्यासाठी ४६ हजार रुपये एवढा आहे. त्याशिवाय त्या कॅमेऱ्यांचे मॉनेटरिंग करण्यासाठीही वेगळा खर्च येतो, तर दुसऱ्या प्रकारच्या कॅमेऱ्यांची किंमत जास्त असून त्यांच्या मॉनेटरिंगचा खर्च कमी असतो. यापैकी कोणत्या कॅमेऱ्याला पसंती द्यायची, हे अद्याप ठरलेले नसल्याचेही सूद यांनी सांगितले. मात्र हे कॅमेरे प्रत्यक्षात महिलांच्या डब्यात कधी बसवले जातील, याबाबत त्यांनी काहीच सांगितले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2015 रोजी प्रकाशित
महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही सज्ज!
मुंबईच्या उपनगरीय प्रवासादरम्यान महिलांच्या डब्यांत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.

First published on: 27-02-2015 at 04:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rail budget 2015 cctv cameras for women security