यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे रेल्वेमंत्री महाराष्ट्रातील असूनही राज्यासाठी मोठय़ा घोषणा झाल्या नसल्याने तमाम जनता सुरेश प्रभू यांच्यावर रुष्ट झाली आहे. मात्र प्रत्यक्षात या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेच्या कामांसाठी साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वीच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळण्यासाठी छोटय़ा छोटय़ा रकमेची तरतूद करण्यापासून काही नव्या मार्गिकांसाठी १८८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र हा निधी पुरेसा नसल्याने मागील काही ‘नव्या मार्गाच्या’ घोषणांप्रमाणेच हे मार्गही सर्वेक्षणाच्याच फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये नवीन मार्ग टाकण्यासाठी प्रभू यांनी ठोस तरतूद केली आहे. यात अमरावती-नरखेड या १३८ किमीच्या मार्गासाठी २५.५० कोटी, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या २५० किमीच्या मार्गासाठी १२३.५० कोटी, वर्धा-नांदेड (पुसद-यवतमाळ मार्गे) या २७० किमीच्या मार्गासाठी ३५ कोटी आदींची तरतूद आहे. महाराष्ट्रासाठीच्या तरतुदींचा विचार केल्यास नव्या मार्गासाठी एकूण १८८ कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे, तर दुहेरीकरणासाठी २६६ कोटी रुपयांचा निधी मध्य रेल्वेकडे देण्यात येणार आहे. वर्धा (सेवाग्राम) ते नागपूर यांदरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेच्या उभारणीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २९७ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि रेल्वेच्या वाहतुकीसाठी महाराष्ट्रातील रूळही बदलण्याचे काम मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी ४५५ कोटी रुपयांचा निधी रेल्वे मंत्रालयाने देऊ केला आहे, तर ७५ कोटी रुपयांचा निधी मध्य रेल्वेकडे फक्त पादचारी पूल, उड्डाणपूल आदींसाठी सोपवण्यात आला आहे. या निधीद्वारे महाराष्ट्रभरात म्हणजेच मध्य रेल्वेच्या पाच विभागांमध्ये अनेक ठिकाणी कामे हाती घेण्यात येणार आहेत.
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्र्यांनी प्रवासी सुविधांबाबतही भरघोस तरतूद केली आहे. यासाठी गेल्या वर्षीच्या निधीपेक्षा ६७ टक्के अधिक निधी राखून ठेवण्यात आला आहे. यापैकी १३० कोटी रुपये मध्य रेल्वेकडे आले असून त्यातून प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात वायफाय सेवेपासून स्वच्छ प्रसाधनगृहांपर्यंत विविध सोयींचा समावेश आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात पहिल्यांदाच रेल्वेमंत्र्यांनी एकाही नव्या गाडीचा उल्लेख केलेला नाही किंवा कोणत्याही एखाद्या मार्गाचा उल्लेख केलेला नाही. मात्र अर्थसंकल्पात डोकावून पाहिल्यास महाराष्ट्रासाठी बरेच काही असल्याचे, पण भरीव असे काहीच नसल्याचे दिसते.
*या अर्थसंकल्पात नवीन मार्गाची घोषणा करताना यात कराड-चिपळूण या ११२ किलोमीटरच्या नव्या मार्गाचाही समावेश करण्यात आला आहे. या नव्या मार्गाचा अंदाजित खर्च १२०० कोटी रुपये असून सध्या या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी येत्या आर्थिक वर्षांत एक लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्याशिवाय नव्या मार्गामध्ये पुणतांबा-शिर्डी (१६.४ किमी) या मार्गासाठी ९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यंदा एक लाख रुपयांचा निधी सर्वेक्षणासाठी दिला आहे.