शिवपुतळय़ाबाबत रेल्वे अधिकारी अनभिज्ञ! ; पुतळा बनवलाच नसल्याचा अजब दावा

तीन वर्षांपूर्वी जे. ज़े  स्कूल ऑफ आर्ट्सच्या मदतीने सॅण्डहस्र्ट रोडमधील वाडीबंदर येथील रेल्वेच्या बंद शेडमध्ये छत्रपतींचा फायबरचा पुतळा साकारण्यात आला.

शिवपुतळय़ाबाबत रेल्वे अधिकारी अनभिज्ञ! ; पुतळा बनवलाच नसल्याचा अजब दावा
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सॅण्डहस्र्ट रोड येथील वाडीबंदर परिसरातील रेल्वेच्या शेडमध्ये ठेवण्यात आला आह़े 

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सॅण्डहस्र्ट रोड येथील वाडीबंदर परिसरातील रेल्वेच्या शेडमध्ये ठेवण्यात आला आह़े  मात्र, याबाबत अनभिज्ञ असून, शिवपुतळा साकारलाच नसल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी सोमवारी केला़  शिवपुतळय़ाबाबत शिवसेना खासदार अरिवद सावंत यांच्याबरोबरच्या बैठकीत हा प्रकार समोर आला़

‘सीएसएमटी’ स्थानकावरील फलाट क्रमांक १८ बाहेरील रेल्वेच्या मोकळय़ा जागेचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्यानुसार या परिसरात दहा-बारा फूट उंच चौथरा आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ २० ते २५ फूट उंचीचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तीन वर्षांपूर्वी जे. ज़े  स्कूल ऑफ आर्ट्सच्या मदतीने सॅण्डहस्र्ट रोडमधील वाडीबंदर येथील रेल्वेच्या बंद शेडमध्ये छत्रपतींचा फायबरचा पुतळा साकारण्यात आला. मात्र, धातूचे काम अंतिम टप्प्यात आले असताना रेल्वेने हे काम थांबवले.

गेल्या तीन वर्षांपासून शिवरायांचा हा पुतळा बंद शेडमध्येच आहे. पुतळय़ासाठी एक कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. रेल्वेच्या हद्दीत पुतळा उभारण्यात येऊ नये, असे धोरण रेल्वे बोर्डाने निश्चित केल्यानंतर वाडीबंदर येथील बंद शेडमध्ये असलेला शिवरायांचा पुतळा ‘सीएसएमटी’च्या दर्शनी भागात उभारण्याच्या मागणीचा पुनरुच्चार शिवसेना खासदार अरिवद सावंत यांनी केला. त्यापाठोपाठ खासदार राहुल शेवाळे यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केली.

खासदार सावंत यांनी आपल्या भागातील रेल्वे प्रश्नांसंदर्भात सोमवारी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापकांबरोबर बैठक घेतली. या बैठकीला विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांच्यासह विविध विभागांतील अधिकारीही उपस्थित होते. यावेळी सावंत यांनी या शिवपुतळय़ाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. मात्र, या बैठकीला उपस्थित असलेल्या एकाही रेल्वे अधिकाऱ्याला या शेडमध्ये शिवरायांचा पुतळा असल्याची माहितीच नव्हती. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सर्व अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. मात्र, शिवरायांचा पुतळा कधी साकारला आणि कुठे ठेवला, याची माहिती नसल्याचे सांगत सर्व अधिकाऱ्यांनी हात झटकले. या प्रकारामुळे खासदार सावंत यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. हा पुतळा मी स्वत: पाहिला असून, याबाबत योग्य निर्णय घेऊन तो ‘सीएसएमटी’च्या दर्शनी भागात बसवण्याच्या मागणीचा पुनरूच्चार त्यांनी केला़  खासदारांच्या समितीकडे हा विषय मांडण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितल़े

मी स्वत: हा शिवपुतळा पाहिला आह़े  मात्र, रेल्वेचे अधिकारी हात झटकत आहेत़  या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेली टोलवाटोलवी उद्या मुंबईत येणाऱ्या खासदारांच्या समितीच्या निदर्शनास आणून देणार आहे. – अरिवद सावंत, खासदार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाविषयी खासदार अरिवद सावंत यांच्याबरोबर सोमवारी झालेल्या बैठकीला रेल्वेचे काही जुने, वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. मात्र, यातील एकाही अधिकाऱ्याला शिवपुतळय़ाबाबत माहिती नसून, मीही अनभिज्ञ आह़े

शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Railway officials unaware of shivaji maharaj statue kept in wadi bunder railway shed zws

Next Story
महाराष्ट्राला अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने वाटचाल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी