* १४ कोटी लिटर पाणी उपलब्ध
* प्रकल्पाचा खर्च अवघा १६ लाख रुपये
* पालिकेच्या एकाही मैदानात प्रकल्प नाही
मुंबईतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी महापालिकेची पर्जन्य जलसंधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) योजना राबविण्याबाबत महापालिका कासवाच्या गतीने प्रवास करीत आहे. पालिकेत गेली वीस वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपनेही याकामी फारसा पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही. मात्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा जोरदार प्रचार चालविला असून त्यांच्याच संकल्पनेतून दादरच्या शिवाजी पार्क येथे साकारलेल्या तब्बल १४ कोटी लिटर पाणी जमा करण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
गेली काही वर्षे मुंबईकरांचे पाण्यावाचून मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत. पालिकेने हाती घेतलेले पाणीपुरवठा प्रकल्प दीर्घकाळ रेंगाळले आहेत. या पाश्र्वभूमीवर वाढत्या लोकसंख्येचा विचार करून रेन वॉटर हार्वेस्टिंगला पालिकेने प्राधान्य दिले, एवढेच नव्हे तर मुंबईत बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात आले. महापालिकेनेही स्वत:च्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे काम हाती घेतले असले तरी हे काम कासवाच्या गतीने सुरू आहे. यातील गंभीर बाब म्हणजे महापालिकेच्या मालकीच्या एकाही मैदान अथवा उद्यानात ही योजना आजपर्यंत अस्तित्वात आली नसल्याचे पालिकेच्याच एका अधिकाऱ्याने सांगितले.
या पाश्र्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्कालीन पालिका आयुक्त सुबोध कुमार व विद्यमान आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे मुंबईत रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना मोठय़ा प्रमाणात राबविण्याचा आग्रह धरला. शिवाजी पार्कसारख्या मोठय़ा मैदानात ही योजना साकारल्यास पाण्याची मोठी बचत होऊ शकते हे लक्षात घेऊन आमदार नितीन सरदेसाई व नगरसेवक संदीप देशपांडे यांना ही योजना राबविण्याचे आदेशही त्यांनी दिले.
त्यानुसार परवानग्यांच्या अडथळ्याची मोठी शर्यत पार पाडून संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कच्या योजनेला अितम मंजुरी मिळवली. या योजनेअंतर्गत वीस कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता असून यातील वापरण्यायोग्य पाणी चौदा कोटी लिटर असणार आहे. यासाठी येणारा खर्च अवघा सोळा लाख रुपये असून राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता माधव गोठस्कर यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.