|| उमाकांत देशपांडे
आता शालेय साहित्यही मिळणार : – शिधावाटप दुकाने आता बहुपयोगी वस्तू भांडार झाली असून शालेय साहित्य (स्टेशनरी) विकण्याचीही परवानगी राज्य सरकारने दुकानदारांना दिली आहे. त्यामुळे आता शिधावाटप धान्य व वस्तूंपेक्षा अन्य साहित्यच अधिक ठेवले जाणार आहे. दुकानदारांच्या दडपणाखाली राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यातून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिधावाटप दुकानदारांनी वर्षभरापूर्वी कमिशन वाढवून देण्याची मागणी रेटली होती. शिधावाटप धान्य व वस्तू विकून पुरेसे उत्पन्न किंवा नफा मिळत नसल्याने खुल्या बाजारातील धान्य विक्रीची मागणी करण्यात आली होती. ती पूर्वीच मान्य झाली. त्यानंतर दूध, भाजीपाला, बि-बियाणे आदींच्या विक्रीसही मान्यता देण्यात आली. तरीही पुन्हा शालेय साहित्य विकण्याची परवानगी द्यावी, असा आग्रह राज्यभरातील ५२ हजार दुकानदारांनी गेल्या काही महिन्यांपासून धरला होता. अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी निलंगेकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. निवडणुकीआधीच ही मागणी मान्य करण्यात आली होती. पण आचारसंहितेमुळे त्याबाबतचे आदेश काढण्यात आले नव्हते. अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबत परवानगी देणारा शासननिर्णय बुधवारी जारी केला.
अन्य साहित्य खरेदी केल्यास शिधावाटपातील वस्तू मिळतील, अशी सक्ती काही वेळा दुकानदारांकडून केली जात असल्याची ग्राहकांची तक्रार असते. पण खुल्या बाजारातील वस्तू, धान्य खरेदीची कोणतीही सक्ती दुकानदारांना ग्राहकांवर करता येणार नाही व त्याबाबत काटेकोर लक्ष ठेवले जाईल, असे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सांगितले.
शिधावाटप दुकानांमध्ये केरोसीन, अन्नधान्य व अन्य वस्तू उपलब्ध असताना गर्दी असते. खुल्या बाजारातील वस्तू व आता शालेय साहित्याचा साठा कसा ठेवणार, हा प्रश्न आहे. वह्य़ा-पुस्तके, कागद आणि केरोसीनसारखा ज्वलनशील पदार्थ एकाच दुकानात उपलब्ध होणार आहे. शालेय विद्यार्थी या दुकानांमध्ये जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मात्र काहीही त्रास होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र मूळ शिधावाटप वस्तूंसाठी असलेली ही दुकाने आता अन्य वस्तूच अधिक विकणार असून त्यांचे रूपांतर बहुपयोगी वस्तू भांडारात होत आहे.
