वाढीव सेवाकरापोटी आजपासून हॉटेलमधील खाणे-पिणे, वास्तव्य महाग

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईसारख्या शहरात किमान आठवडय़ात एकदा हॉटेलमध्ये खान-पान व महिन्याला एकदा तारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करणाऱ्यांना आता या चैनीसाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. साध्या उडप्याच्या हॉटेलपासून ते दिवसाचे पाच आकडय़ातील भाडे आकारणाऱ्या आदरातिथ्य सेवा क्षेत्रावर थेट २८ टक्क्यांपर्यंतचा सेवा कर शुक्रवार रात्रीपासून लागू झाल्याने ग्राहकांच्या खिशावर भार पडणार आहे.

विविध १६ करांना एकाच वस्तू व सेवा करप्रणालीत आणताना वस्तू व सेवेच्या प्रत्येक टप्प्यावर करमात्रा लागू केल्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्राहकांना वाढीव सेवा कराच्या रूपात बसणार आहे. खाणे-पिणे आणि भटकंतीचा शौक असणाऱ्यांना तर आता अतिरिक्त तरतूद त्यांचे आर्थिक नियोजन करताना करावी लागणार आहे.

आदरातिथ्य क्षेत्रात वातानुकूलित, बिगर वातानुकूलित अशी कर आकारणीसाठीची नवी रचना आता अस्तित्वात नसेल. परिणामी वातानुकूलित सुविधा असलेल्या मात्र त्याचा लाभ न घेणाऱ्या ग्राहकांनाही आता १८ टक्क्यांच्या प्रमाणात कर त्यांच्या बिलावर लागेल. तर दिवसाला एक हजार रुपयांवरील भाडय़ापोटी तारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यापोटी ग्राहकांना १२, १८ व २८ टक्के प्रमाणात कर मोजावा लागेल.

छोटी उपाहारगृहे नव्या कराकरिता तो स्वतंत्र आकारण्यापेक्षा खाद्यपदार्थाच्या किंमतींमध्येच समाविष्ट करण्याची शक्यता अधिक आहे. ग्राहक व हिशेबाच्या दृष्टीनेही हेच सोईस्कर असल्याचे कार्निवोरचे हॉटेलचे संचालक जय काटे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मूल्यवर्धिक करापोटी सध्या आम्ही ६ टक्के कर बिलावर आकारतो; मात्र आता वाढीव करामुळे कर वेगळा दाखविण्याऐवजी तो मूळ खाद्यपदार्थाच्या किंमतीसह लागू करणे ग्राहकांनाही सुलभ होईल, असेही ते म्हणाले. वाढीव कर नमूद केल्यानंतर खाद्यपदार्थाच्या किंमतीही वाढविणे म्हणजे ग्राहकवर्गाची नाराजी ओढवून घेणे होय, असे ते म्हणाले.

छोटय़ा हॉटेलचालकांना त्यांच्या खाद्यपदार्थाच्या किंमतीत कर समाविष्ट करणे रास्त ठरेल. मात्र मोठय़ा हॉटेलना कर हा स्वतंत्र दाखविणे आवश्यक ठरेल. आदरातिथ्य क्षेत्रात जागेचे दर, व्यवसाय स्थापन करण्यातील गुंतवणूक याकरिता मोठी किंमत मोजावी लागते. त्यात आता वाढीव सेवा कराचा भार समाविष्ट करणे मोठय़ा हॉटेलचालकांना आव्हानात्मक बनणार आहे. सेवा करापोटी ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागणार असल्याने हॉटेलचालक त्यांचे दिवसाचे भाडे तूर्त वाढविणार नाहीत.

– दिलिप दातवानी, अध्यक्ष, हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोसिएशन (पश्चिम विभाग)

तीन टक्के वाढीव सेवाकराचा भार सर्वच श्रेणीतील हॉटेल क्षेत्रावर पडणार आहे. यामुळे ग्राहकसंख्या रोडावण्याची शक्यता अधिक आहे. सरकारने या क्षेत्रावर कर आकारणे योग्यच आहे; मात्र त्याची मात्रा कमी असायला हवी होती. शिवाय कर सुसुत्रीकरणाऐवजी ते अधिक किचकट झाले आहे. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी हॉटेलसंचालकांच्या दृष्टीने कशी होते व व्यवसायाच्या नफा-तोटय़ाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच दर वाढविण्याबाबत विचार केला जाईल. तूर्त ग्राहकांना मात्र करापोटी अधिक रक्कम मोजावी लागेल, हे निश्चित.

– विशाल कामत, संचालक, कामत ग्रुप ऑफ हॉटेल्स.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restaurant bills are set to rise after gst