ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नव्या अटीमुळे शहरातील अनेक जुन्या रिक्षांच्या परवान्याचे नुतनीकरण  रखडले आहे. या नव्या अटीची पुर्तता करण्यासाठी रिक्षांना आपल्या वाहनात काही सुटे भाग बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी किमान दोन हजार रुपयांचा खर्च येणार असला तरी हे सुटे भाग बाजारात उपलब्ध होत नसल्याची रिक्षाचालकांची तक्रार आहे. त्यामुळे परवान्याचे नुतनीकरण रखडल्याने संतप्त झालेल्या शेकडो रिक्षा चालकांनी सोमवारी मर्फी येथील परिवहन कार्यालयाभोवती ठिय्या मांडला. तसेच नव्या रिक्षांच्या परवाना नुतनीकरणाचीही बंद पाडली. त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण होते.
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दररोज शहरातील सुमारे दोनशे ते अडीचशे रिक्षांच्या परवान्यांचे नुतनीकरण करण्यात येते. गेल्या बुधवापर्यंत परवाना नुतनीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होती. मात्र, गुरूवारपासून परिवहन कार्यालयाने या प्रकियेसाठी नवी अट लागू केल्याने रिक्षाचालक संतप्त झाले आहेत.