शहरी भागात हातसफाईची करामत दाखविणाऱ्या सोनसाखळी चोरांनी सध्या एमआयडीसी भागात मोर्चा वळविला असून बुधवारी इंडियन एक्सप्रेस समुहाच्या महापे येथील छापखान्यात काम करणाऱ्या महिलेला रस्ता ओलंडताना त्यांचा फटका सहन करावा लागला.
प्रेस मध्ये येताना दोन मोटारसायकल स्वारांनी पाठीमागून येऊन  प्रगती तिवारी या महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला पण तो हाती न लागल्याने तिवारी यांचा मोबाईल चोरटय़ांनी लंपास केला. एमआयडीसी भागात पोलिसांची गस्त कमी असल्याने चोरटय़ांना या भागात आपले काम फत्ते करण्यास चांगली संधी मिळत आहे. दरम्यान एमआयडीसी भागातील एटीएम मधून पैसे काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना लुटण्याच्या घटना घडत आहेत.
नवी मुंबईत सोनसाखळी चोरटय़ांनी गेल्या काही महिन्यांपासून उच्छांद मांडला असून दिवसागणिक सरासरी दोन घटना सोनसाखळी चोरीच्या घडत आहेत. त्यामुळे महिलावर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास महापे येथील इंडियन एक्सप्रेसच्या छापखान्यात काम करणाऱ्या प्रगती तिवारी  कंपनीसमोरील रस्ता ओलांडत होत्या. तेवढय़ात शिळफाटा दिशेने आलेल्या दोन मोटारसायकल स्वारांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. चोरटय़ांनी दिलेल्या हिसक्यामुळे तिवारी खाली पडल्या. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली. याचवेळी चोरटय़ांनी तिवारी यांचा मोबाइल घेऊन पोबारा केला. या घटनेची तक्रार तुर्भे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करुन मोटारसायकलस्वारांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली पण हाती काही लागले नाही.
मध्यंतरी मुंब्रा आणि चेंबूर भागात राहणाऱ्या एका सोनसाखळी चोरटय़ांच्या टोळीला नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केल्यानंतर सोनसाखळी चोरीचे हे प्रमाण कमी झाले होते. सोनसाखळी चोरुन काही मिनिटात हे चोर चेंबूर, मुंब्रा भागात जात होते. त्यामुळे त्यांना पकडणे मुश्किल झाले होते. चोरटय़ांनी आता नवीन शहराऐवजी आपला मोर्चा एमआयडीसीतील कामगार वर्गाकडे वळविला असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईतील लघु उद्योजक संघटना या संर्दभात गृहमंत्री आर. आर. पाटील यांना लवकरच एक निवेदन देणार आहेत.