राजधानी एक्स्प्रेसमधून महिलांचे सामान चोरीला जाण्याच्या घटना ताज्या असताना रविवारी वापी पॅसेंजरमध्ये दरोडा पडला. दोन चोरांनी प्रथम वर्गाच्या डब्यात शिरून दोन महिलांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.
खुशबू कटारिया (३१) ही तरुणी आपल्या आईसह रविवारी गुजरातेतून मुंबईला येत होती. त्या दोघी वापी पॅसेंजरच्या प्रथम वर्गाच्या डब्यात बसल्या होत्या. दादरला उतरून त्या माहिमला आपल्या घरी जाणार होत्या. रात्री पावणेनऊ वाजता गाडी अंधेरी स्थानकात आली. तेव्हा सर्व प्रवासी उतरून गेले होते. डब्यात खुशबू आणि तिची आई अशा दोघीच होत्या. मात्र गाडीने अंधेरी सोडताच त्यांच्या केबिनचे दार वाजले आम्ही तिकीट तपासनीस आहोत, असे सांगून दोन जण जण डब्यात शिरले. त्यांनी या दोघींना मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल फोन, सोन्याचे दागिने असा मिळून एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.
वांद्रे स्थानकात त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली. हा गुन्हा अंधेरी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गाडी शेवटच्या स्थानकात जात असल्याने डब्यात कुणी प्रवासी नाहीत, याची आरोपींना माहिती होती. त्यानुसार त्यांनी लुटीची योजना बनवली असावी, असे अंधेरी रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश किरदत्त यांनी सांगितले.