लोकलमधील महिलांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे, टॉकबॅक यंत्रणा बसवण्याची घोषणा करणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेला गेल्या चार वर्षांत या कामात फारशी प्रगती करता आलेली नाही. पश्चिम व मध्य रेल्वेच्या १ हजार ७ महिला डब्यांपैकी फक्त २८९ महिला डब्यांतच कॅमेरे आणि आठ लोकलच्या महिला डब्यांमध्ये टॉकबॅकसारखी यंत्रणा बसवली आहे.
लोकलच्या महिला डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला होता. आतापर्यंत पश्चिम रेल्वेवरील ३३७ महिला डब्यांपैकी १२९ डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर मध्य रेल्वेवरील ६७० डब्यांपैकी १६० महिला डब्यांतच कॅमेरे बसवता आले आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी मात्र, ही कामे लवकरच पूर्ण केली जातील, असे स्पष्ट केले.
टॉकबॅकलाही गती नाही
लोकलमधील मोटरमन आणि गार्डशी संवाद साधता यावा यासाठी महिला डब्यात टॉकबॅक यंत्रणा बसवण्याचीही योजना आखली होती. प्रत्येक महिला डब्यात दोन ते तीन टॉकबॅक यंत्रणा बसवण्याचे नियोजन होते. मात्र, सध्या पश्चिम रेल्वेवरील दोन आणि मध्य रेल्वेवरील चार लोकलच्या डब्यांमध्येच ही यंत्रणा कार्यान्वित आहे.
मेमू, डेमू गाडय़ांना प्रतीक्षा
महिला डब्यांबरोबरच लोकल, मेमू, डेमू गाडय़ांच्या सर्वच डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने एप्रिल २०१९ मध्ये घेतला. जवळपास १० हजार ३४९ डब्यांत हे कॅमेरे बसवले जातील. मोठय़ा प्रमाणात राबवण्यात येणारी ही यंत्रणा रेल्वे बोर्डाकडून हाताळली जाणार आहे. परंतु अद्याप त्यालाही वेग मिळालेला नाही.