मराठी सिनेसृष्टीतील अभिनयाचा सम्राट असे सार्थ वर्णन करता येणाऱया अभिनेते सतीश तारे यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. जुहूतील सुजय रुग्णालयात तारे यांनी बुधवारी दुपारी १२.०५ वाजता अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी पायाला गँगरिन झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेही असलेल्या तारे यांच्या यकृताला सूज आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. तारे यांचे मागे पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
मराठी रंगभूमी, छोटा पडदा आणि चित्रपटसृष्टी या सर्वच आघाड्यांवर तारे यांनी आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाने आणि दमदार अभिनयाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. विनोदाचा हुकमी एक्का म्हणून तारे प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाले. मराठी भाषेवर आधारित तसेच प्रसंगोचित विनोद किंवा कोट्या करण्यात तारे यांचा हातखंडा होता. त्यांच्याविषयी प्रेक्षकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली होती. सतीश तारे यांची भूमिका बघण्यासाठी अनेक प्रेक्षकांची पावले रंगभूमीकडे किंवा चित्रपटगृहांकडे वळत असत. नव्या पिढीमध्येही तारे यांच्या अभिनयाबद्दल उत्सुकता होता.
तारे यांनी आपल्या विनोदी भूमिकांच्या ताकदीवर अनेक नाटके गाजवली. झी मराठीवरील फू बाई फू या विनोदी कार्यक्रमामध्येही तारे यांनी छोट्या छोट्या भूमिका वठवून आपल्या अभिनयाची कसब प्रेक्षकांना दाखवली होती. अभिनेत्याबरोबरच लेखक आणि गायक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. ‘सारेगमप’मधून ते गायक म्हणून प्रेक्षकांच्या समोर आले होते. तारे यांनी या वर्षी रंगभूमीवर पुनरागमन केले होते. त्यांचे सध्या रंगभूमीवर “गोडगोजिरी” हे नवे नाटक सुरू होते. या नाटकाचे काही प्रयोगही झाले होते. त्याचबरोबर ‘मोरूची मावशी’ हे गाजलेले नाटकही त्यांनी नव्या संचासह पुन्हा रंगमंचावर आणले होते.